Tuesday, 28 January 2020

मृत्यू - एक अटळ सत्य

मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं.

कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे.

त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत.

त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे.

त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.

मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर.

दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील.

त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही.

त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections घ्यावी लागत असे.

मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे.

मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं.

मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच खरं.

चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज.. कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच नाही.

Thursday, 23 January 2020

🔸🔸🔸🔸🔸🔹🔸🔸🔸🔸🔸
*रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते टर्मिनल ?*

*जर कुठल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ तिथून पुढे ट्रॅक नाही. म्हणजे रेल्वे ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार. टर्मिनसला टर्मिनल पण म्हटले जाते. म्हणजे असे स्टेशन जिथून रेल्वे पुढे न जाता आली त्याच दिशेने परत जाते. आपल्या माहितीसाठी देशात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनल लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हे देशातील सगळ्यात मोठे टर्मिनल आहेत.*

 *चला तर तुम्हाला सांगतो की, रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते सेंट्रल ?*

*स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असले तर त्या शहरात एक पेक्षा अधिक स्टेशन आहेत. ज्या रेल्वे% स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असते ते त्या शहरातील सगळ्यात जुने स्टेशन असते. रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेलं असण्याचा दुसरा अर्थ असा की ते त्या शहरातील सगळ्यात व्यस्त राहणारे स्टेशन आहे. तुमच्या माहितीसाठी सध्या भारतात मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, मंगलोर सेंट्रल, कानपुर सेंट्रल हे प्रमुख सेंट्रल स्टेशन आहेत.*

 *रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते जंक्शन ?*

*कुठल्याही स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असणे म्हणजे त्या स्टेशनवर येण्या जाण्यासाठी ३ पेक्षा अधिक मार्ग आहेत. म्हणजे ट्रेन एका मार्गाने येऊन त्या स्टेशन वरून इतर दोन मार्गावरून जाऊ शकते. त्यामुळे स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असते. सध्या देशात मथुरा जंक्शन (७ रुट्स), सालेम जंक्शन (६ रुट्स), विजयवाड़ा जंक्शन (५ रुट्स ), बरैली जंक्शन (५ रुट्स) हे जंक्शन स्टेशन आहेत.*
🔸🔸🔸🔸🔸🔹🔸🔸🔸🔸🔸
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
            *मतदानाच्या शाईची कथा.*

*मतदाराने मतदान केल्याची खूण म्हणून बोटावर जी शाई लावली जाते, ती गेली ५६ वर्षे मैसूर येथे बनविली जात आहे याची अनेकांना माहिती नसेल. हि शाई सर्वप्रथम मैसूरचे महाराज कृष्णराज वाडियार यांनी १९३७ मध्ये स्थापन केलेल्या मैसूर इंक लॅक अँड पेंट लिमिटेड या कारखान्यात बनविली गेली. मात्र तिचा प्रथम वापर १९६२ मध्ये केला गेला. पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना या शाईची संकल्पना सुचली.*

*त्याआधी बोटाला डाय लावला जायचा. त्यानंतर आजतागायत हीच शाई निवडणूक प्रक्रियेत वापरली जात आहे.*

*मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमीटेड या कंपनी मार्फत या शाईचे उत्पादन होते. हि शाई येथून मालदीव, अफगाणिस्थान, कंबोडिया, मलेशिया, इजिप्त, द.आफ्रिका या देशात निर्यात केली जाते. या शाईसाठी विशेष फॉर्म्युला वापरला जातो.*

*या शाईत २५ टक्क्यांपर्यंत सिल्वर नायट्रेट असतं. हे खूप महागडं रसायन असतं हे जांभळ्या रंगाचे विशेष रसायन सूर्यप्रकाशात रंग बदलते आणि सहजी ते घालविता येत नाही.*

*भारतात हाताच्या नखाखाली हि शाई मतदान केल्यावर लावली जाते, तर मालदीव कंबोडियात बोट या शाईत बुडविले जाते. बुरांडी, बुर्कीनो फासो येथे ती ब्रशने लावली जाते तर इजिप्त मध्ये त्यासाठी पेन वापरले जाते.*

*निवडणुकीसाठी पुरविण्यात येणाऱ्या शाईची खूप दक्षता घेतली जाते, आणि तिचा चोख हिशोब ठेवला जातो. या शाईच्या एका बाटलीतून ७०० ते ८०० मतदारांच्या बोटावर खूण करता येते. उरलेली शाई निवडणूक कार्यालयात जमा केली जाते आणि नंतर ती नष्ट केली जाते.*

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

Tuesday, 21 January 2020

मराठी भाषा पंधरवडा निमित्त

      🙏वंदन मायबोलीला🙏

मायबोली माझी मराठी
करतो तिजला वंदन
तिच्याचमुळे फुलले
माझ्या जीवनाचे नंदनवन

कधी न फिटती उपकार
माझ्या मायबोलीचे
मायबोलीने घडविले
दर्शन थोर विचारांचे

लावते अम्रुत ओठी
माय मराठी
आठवती नित्य
सानेगुरुजींच्या गोष्टी

विश्वात्मकतेचा नंदादीप
पेटविला संत ज्ञानेश्वरांनी
भक्तीच्या मंदिरावर कळस बांधला
महाराष्ट्र संत तुकोबा रायांनी

दासबोध करुणाष्टके मनाचे श्लोक
आरत्या,श्री हनुमंताची देवळे
साकारणार्या समर्थ रामदासांनी
राष्ट्रभक्तीचेही धडे दिले

पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे
बालकवी,राजकवी,बा.भ.बोरकर
यांच्यासह दुर्गाबाई,इरावती कर्वे
शांता शेळकेंनी फुलवला बहर

खांडेकर,कुसुमाग्रज, विंदा,नेमाडे
हे सारस्वत ज्ञानपीठाचे मानकरी
जनाई,मुक्ताई,बहिणाईचे वाङमय
हे तर सुवर्ण लेणे साक्षात् ईश्वरी

फादर दिब्रिटोंसह सर्व अध्यक्षांनी
वाढविली मायबोलीची श्रीमंती
कधी न फिटती उपकार जिचे
त्या माय मराठीची गाऊ आरती

राजेंद्र र.वाणी
दहिसर मुंबई🙏🌷

Monday, 30 December 2019

*लक्ष्मीची पावलं..!*

लहानशी गोष्ट आहे. रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच  होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस-तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले..!

*दुकानदार* - काय सेवा करू..?

*मुलगा* - माझ्या आईला चप्पल हवीय. टिकाऊ पाहिजे..!

*दुकानदार )* - त्या आल्या आहेत का..? त्यांच्या पायाचं माप..?

मुलाने आपलं वाॅलेट बाहेर काढलं. त्यात चार घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आऊटलाईन काढलेली दोन पावलं होती.

*दुकानदार* - अरे, मला मापाचा नंबर चालला असता..!

तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखं बोलता झाला 'काय माप सांगू साहेब..?
माझ्या आयनं जिंदगीभर पायात कदी चप्पलच घातली नाय. आई ऊसतोड कामगार होती. काट्याकुट्यात कुटं बी जात्ये. अनवानी ढोरावानी मेहनत केली. मला शिकवलं. मी शिकलो अन् नोकरीला लागलो. आज पहिला पगार झालायं. दिवाळीला गावाकडं चाललोय. आईला काय नेऊ..? हा सवालच पैदा होत नाही. माझे किती वर्षांच स्वप्न होते. पहिल्या पगारातून आईला चपला घेऊन जायच्या.'

दुकानदारान चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. आठशे रूपये किंमत होती. त्या पाहून मुलाने 'चालतंय की..!,' असे सांगितले. त्याची तयारी त्याने केली होती.

दुकानदाराने सहज विचारले, 'किती पगार आहे रे तुला..?

*मुलगा* - सध्याच्याला बारा हजार आहे. राहणे, खाणे धरून सात-आठ हजार खर्च होतात. दोन तीन- हजार आईला धाडतो..!

*दुकानदार* - अरे मग आठशे रूपये जरा जास्त होतात.

मुलाने दुकानदाराला मध्येच रोखत असुद्या म्हणून सांगितले.दुकानदाराने बाॅक्स पॅक केला. मुलाने त्याला पैसे दिले आणि तो आनंदात बाहेर निघाला. एवढी महागाची भेट किंमत करताच येणार नव्हती त्या चपलांची...!

पण दुकानदाराच्या मनात नेमके काय आले कुणास ठाऊक. मुलाला, जरा थांब असे सांगितले. दुकानदाराने अजून एक बाॅक्स मुलाच्या हातात दिला.

दुकानदार म्हणाला, 'ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असे सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला सांग आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही.'

दुकानदाराचे आणि त्या मुलाचे असे दोघांचेही डोळे भरून आले. 'काय नाव तुझ्या आईचं..?,' असे  दुकानदाराने विचारलं तर तो *लक्ष्मी* असे ऊत्तरला.

दुकानदार लगेचच बोलला, 'माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला..? पावलांची आऊटलाईन काढलेला तो कागद हवाय मला...!


तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेऊन आनंदात निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदाराने  दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. दुकानातील देव्हाऱ्यातला तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिनं विचारलं, 'काय आहे हे बाबा..!

दुकानदार दिर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला *लक्ष्मीची पावलं'* आहेत बेटा...!. एका सच्च्या भक्ताने काढली आहेत. त्यानं बरकत येते धंद्याला..!. लेकीनं, दुकानदाराने आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला..!
 .....#आणि_म्हातारी_अमर_झाली.

लेखक- मनवंतराव साळुंखे.

       रात्री बराच वेळ झाला होता. भुसावळ जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही.
       तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी भुसावळ जाणारे होते. एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकिट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर फाटा असलेल्या व तेथुन तीन चार किलोमिटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागु लागली.
     बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल?
     तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, 'तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला? लवकर उजेडात निघुन जायायचे ना?'
     म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तीला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला.
     इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तीला उतरुन देवु पण धड चालता न येणारी, व्यवस्थीत रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पाऊसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल? रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर?
      तेवढयात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली. वाहक उठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तीचे बखोटे धरून तीला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.
      बाहेर डोळयांना काहीही दिसत नव्हते. त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहचविणे.
     म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकु लागली.
     इकडे बस चालक व प्रवाशींची 'दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे?' अशी काव काव सुरु झाली. चालकाने बसखाली उतरुन बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येवुन पडला की काय? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल.
     संताप झाला त्याचा. प्रवाशीही संताप करु लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडुन हा निघुन गेला. काही म्हणाले 'चला हो, त्याला राहु द्या' वगैरे वगैरे.
       इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, 'बा तुझे नांव काय रे?'
     'तुला काय करायचे आजी माझ्या नांवाशी... मी महादू शिंदे.'
      'कोणत्या डेपोमध्ये आहे?'
     वाहक- 'चोपडा.'
     आजी - 'मुलेबाळे?'
     वाहक- 'आहेत दोन.'
     तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलुपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.
      ती म्हातारी त्या घरात व गांवात एकटी राहत होती. तीला जवळचे म्हणुन कोणीच नातेवाईक नव्हते. तीच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तीच्या आजुबाजुला फिरकत नसे.
      तीही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तीला वाटणे स्वाभाविक व सहजही होते.
      गांवा लगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तीच्या मालकीचे होते. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवुन आपला उदरनिर्वाह करायची.
      असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तीने गांवचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलाविले म्हणुन नवल वाटले.
      ते घरी आले. म्हातारी उठुन बसली व त्यांना म्हणाली, 'दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर महादू शिंदे, कंडक्टर, चोपडा याच्या नावावर लिहुन द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातुन मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही.
      सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे, कोण हा महादू शिंदे कंडक्टर? त्याला सर्व म्हातारी का देतेय? असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.
      दोन तीन दिवसात म्हातारी वारली. सरपंच व ग्रामसेवकाने तीच्या सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू शिंदे कंडक्टरचा चोपडा बसस्थानकावर शोध घेतला. त्याला भेटुन सर्व वृत्तांत सांगितला. साधारण वर्षभरापूर्वीचाच बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकुन तर त्याला रडुच कोसळले.
     त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.
      वाहक महादू शिंदे गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गांवाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले. तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले.
      महादू शिंदेंच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा लागल्या. मी केलेल्या एका छोटयाश्या मदतीची म्हातारी एवढी किंमत देवुन गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.
     बाजुलाच मुलांचा गलका त्याला ऐकु येत होता. त्याने विचारले, 'येथे शेजारी हायस्कुल भरते का?'
       सरपंचाने, 'हो, शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.' असे सांगितले.
      वाहक म्हणाला, 'का? गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?'
      सरपंच म्हणाले, 'गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.'
      वाहक महादू शिंदे ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, 'हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत. हे घर पण विक्री करा. त्यातुन येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकुन शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नांव टाका.'
     टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावुन गेले. 'दरवाज्यालाच काय हायस्कुलला म्हातारीचे नांव देवु.'
      वाहक महादू शिंदे यांनी त्यांचे आभार मानुन निरोप घेतला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला. झोळी फाटकी असुन सुद्धा गांवाचे सारे काही तो गांवालाच देवुन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला.
      बंधुनो, एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करुन जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडु नका.
©मनवंतराव साळुंखे,
 धाबे, पारोळा.
(आवडल्यास शेअर करतांना कृपया लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती- मेघःशाम सोनवणे.)
श्री. मधुकर पोतदार, नाशिक, यांच्या संग्रहातून.
C/P.

Thursday, 26 September 2019

शेती आणि शेतकरी

शेती आणि शेतकरी 
का शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या 
नाही खूपत मनाला ?
शेतकऱ्यांचा तो आक्रोश का 
ऐकू येत नाही कुणाला ?
उपयोग नाही झाला 
करून पेरणी दुबारा 
झाला अवकाळी पाऊस 
अन् पडल्या गारा 
बिघडुन विस्कटुन गेला 
हिशोबाचा मेळ सारा 
शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या 
थांबल्या नाहीत धारा 
घर प्रपंचासाठी त्यांच
सर्वस्व लागलं होतं पणाला 
पण शेतकऱ्यांचा तो आक्रोश 
ऐकू येत नाही कुणाला
शेतकरी राजा बिचारा 
झाला आहे मुका
आसवांचा ओघ 
झाला आता सुका 
मदतीला धावतो कोणी 
नेता, अभिनेता 
सांडवतात इकडे तिकडे 
गोळा केलेल्या व्यथा 
व्यथेच्या त्या कथा आता 
नाही स्पर्शत रे कुणाला 
शेतकऱ्यांचा तो आक्रोश 
ऐकू येत नाही कुणाला
बरी नव्ही रे शेतकरी दादा 
सावकाराशी ती गट्टी 
कश्याला हवी पोकळ
प्रतिष्ठा ती खोटी 
हुंड्याची ती प्रथा मला 
भासली आज अघोरी 
लटकलेल्या बापाच्या फाशीची 
तिच तर रे दोरी 
खचू नकोस रे दादा 
आणि नको स्पर्श त्या दारूला 
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं नाही रे
घेणे-देणे आता कुणाला
मंत्री संत्री करती 
गुर्हाळ ती चर्चेची 
भळभळणाऱ्यां जखमेवर 
मलमपट्टी ती वरवरची 
माध्यम ही चघळतात 
शेतकऱ्यांच्या दूःखांना 
फूटत चालल्या आहेत साऱ्यांच्या 
डोळ्यातल्या संवेदना 
का झालं ते विवश मन 
हतबल निसर्गाच्या कोपाला 
शेतकऱ्यांचा तो आक्रोश 
ऐकू येत नाही कुणाला
शेतकरी दादा…
तुला कायमची मदत 
नाही रे कोणी करणार 
तुझं तुलाच सावरायला हवंय 
तुला कधी रे कळणार ?
उघडे डोळे ठेवून तुला 
आता जागृत रहायला हवं
गरज पडली तर हक्कासाठी 
कधी भांडायलाही हवं 
बदल राजा स्वतःला आता 
आणि कर समर्थ त्या मनाला 
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता 
नाही खूपत रे कुणाला 
नाही खूपत रे कुणाला…
डॉ. सुभाष कटकदौंड – खोपोली

।। शेती आणि शेतकरी ।।
।। शेती आणि शेतकरी ।। 
★★★★★ 

© Rajesh Sabale

 1 Minutes    7.4K     7

Content Ranking

पोटच्या जीवा परी, शेतावरी केली माया।
कधी पिकलं शेतात, मूठ भर पीक खाया।।

मेघ पाहून आकाशी, काय शेतात पेरावं।
भेगाळल्या शेतास बांधावरून पहावं।।

रानंमाळ शेती सारी, उन्हानं करपली।
गुरढोर माणसांची, तोंड उन्हान सुकली।।

वाट पिकाची लागली, शेती गेली सारी वाया।
एक थेंब पावसाचा, नाही तोंडात टाकाया।।

विहिरी तलाव तळी, सारी उताणी पडली।
तरी दया कशी नाही, आता पावसास आली।।

आस वाटते मनाला, मेघ येईल धावत।
आता येईल पाऊस, सोनं पिकलं शेतात।।