Tuesday, 28 September 2021

प्रसाद

 🥥*"पाहे प्रसादाची वाट"*🥥


*प्रसाद हा देवाचा प्रतिसाद.*


*एका छोटय़ाशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.*

*देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:ख भरली कहाणी माहीत नव्हती.*

*कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !*

*गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱयाचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो. खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाटय़ाला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते.    . गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.*

*एकदा लेखकाची नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवरा-आवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढय़ात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’*

*मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.*

*परमार्थ वेगळे काय शिकवतो ? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!*

*देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोडय़ातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.*

मजेशीर कविता

 😃😃😃😃😃😃😃

 *मजेशीर कविता* ....

चाल चाल चालले, तरी वजन कमी होईना 

धाव धाव धावले, तरी काटा काही हलेना 


सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार 

चहात बुडवून खाल्ली बिस्किटं फक्त चार 


मग मारल्या थोड्या, दोरीवरच्या उड्या 

चवीसाठी खाल्ल्या दोन खोबऱ्याच्या वड्या 


योगासने करायची मग झाली वेळ 

पटकन खाऊन घेतली हेल्दी डायेट भेळ 


व्यायामाच्या घाईत सकाळ गेली टळून 

जेवणासाठी घेतले गरम वडे तळून 


मुखशुध्दीसाठी खाल्ले काजू-बदाम 

मनःशांतीसाठी केला थोडा आराम 


संध्याकाळ होताच जॉईन केले जिम 

घाम आला म्हणून खाल्ले आइसक्रीम 


वजन घटण्यासाठी चालत गेले घरी 

डीनरसाठी केला बेत श्रीखंड आणि पुरी 


दुस-या दिवशी सकाळी वजन करू म्हटले 

इतक्या मेहनतीने बघू वजन किती घटले 


कालच्यापेक्षा आज वजन वाढले थोडे

वजनकाटा चुकला कसा?  मला पडले कोडे ! 

😂😂🤣🤣


काल वडाने,आपट्याला विचारलं,

दुखतंय का रे जास्त..?

तुझ्याही फांद्या, तुझीही पानं,

माणसाने केली ना ध्वस्त...


वर्षातून एक दिवस,

म्हणे आपला असतो मान,

कुणी विचार करतो का,

आपल्यातही असतो प्राण...


त्यांचा उत्सव साजरा होतो,

आपली म्हणे होते पूजा,

त्यांना कुठे कळतेय मित्रा,

आपल्याला होणारी ईजा..


पूर्वी बांधायचे दोर वडाला,

आता फांद्या तोडून नेतात,

लचके तोडून त्याच वडाला,

काय तर म्हणे देव म्हणतात..


गरजेपेक्षा जास्त किती,

तोडतात फांद्या नी पाने,

निर्जीव झालेल्या पानांना,

मग म्हटलं जातं "सोने"


दुसऱ्याच दिवशी सोन्याचा,

फक्त पालापाचोळा होतो,

कालचा देव आज मात्र,

पायदळी तुडवला जातो...


कसली म्हणायची श्रद्धा ही,

कसली रे पही भक्ती,

स्वतःला नी निसर्गाला,

फसवायचीच ही युक्ती...


विरोध नाही आमचा कुठल्या,

चाली रीती प्रथांना,

पण बघवत नाही निसर्गाचा,

ऱ्हास उगा होताना


आपण कधी स्वतःला,

देव म्हणवून घेत नाही,

खूप आहेत दुःख आपली,

पण बोलता येत नाही...


आपण देतोय भरभरून,

त्यांनी गरजेपुरतंच घ्यावं,

सण साजरे करावे पण,

आम्हालाही जगू द्यावं...


-एक वृक्ष

Wednesday, 2 December 2020

Binding factors

 *Binding Factor*


" करंजी च्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो." 


*लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची.*


पण कणिकच का? तांदळाचे  पीठ का नाही? तर त्यावर " अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. 

तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. " 


"मग आपण खव्याच्या किंवा मटार च्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ? माझा अजून एक आगाऊ प्रश्न। 

तर त्यावर " अग मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते।" 

तितकेच शांत पण तत्पर उत्तर. 

        

        पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर रेणू जुळणी तंत्राचा अभ्यास करताना हे सगळं उपयोगी पडले आणि त्यातले विज्ञान ही समजले. 


*किती सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समाजवल्या _* 


1. *अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात.*


2. *ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.* 

      

     नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. 

        

          आणि आज दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली. 


नात्यांचंही असच आहे... 


*प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो , जो सर्वाना धरून ठेवतो.*

    

    मग ती एखादी अशी मैत्रीण असते जी बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणते , व्हाट्सअप्प ग्रुप बनवते आणि " contact मध्ये रहायचं ह" अशी प्रेमळ दमदाटी ही करते. 


कधीकधी असा binding  factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते. 

    

      *आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factor दिसतात.*


आपण त्याना एकेकदा भेटलेलेही नसतो  पण ते मात्र आपली चौकशी करतात, काळजीही करतात. आशा सगळ्या  binding factors ना माझा मानाचा मुजरा !!


समाजातील माणूसपण टिकून राहणे महत्त्वाचे.

    

 मंडळी, आपण मोठे झालो , *चला तर आता सर्वांना मिळवून आणणारे होऊ या.*

सुंदर

 _*"सुंदर.."*_


_लेखक- कौस्तुभ केळकर नगरवाला._


       तो हॅन्डसम वगैरे कधीच नव्हता. गरीब गाय मात्र नक्कीच होता. स्वभावाने आणि खिशानेही.

       कामकरी. आधी पोट मग पाटी. कमवा आणि शिका. आयुष्यभराचा विद्यार्थी.

      ग्रॅड्युएट झाला. नोकरीत इंटरेस्ट नव्हताच. जीभेवर खडीसाखर. माणसं जोडणारा फेव्हीकाॅली स्वभाव. मदतीला सदैव तयार. अशा माणसाला कोण मदत करणार नाही ?

       दोन चार आठ दहा.

सगळ्या लोकांनी मदत केली. पुरेसं भांडवल गोळा झालं. नवीनच झालेली ती पाॅश सोसायटी. सोसायटीच्या दारातला एक गाळा घेतला. डेली नीडस्'चं त्याचं दुकान.

सुरू झालं.

       गावाकडचा त्याच्यासारखाच एक धडपळू सोबतीला घेतला, होम डिलीव्हरीसाठी. वाॅटस्सप केलं की शून्य मिनटात डिलीव्हरी. 

      लोकांचा आळस... त्याची पळापळ. दुकान जोरात पळू लागलं. दोन तीन वर्षात सगळी देणी सपाट. काय नव्हतं त्याच्याकडे ? वाट्टेल ते.. सगळं मिळायचं. 

      गावाकडे जायला वेळ मिळेना. आजूबाजूच्या दहा बारा सोसायट्या. तो नसला की त्यांना आॅक्सीजन कमी पडायचा.

     त्याच्या डोक्यात एक्सपान्शनचे विचार. नाक्यावरची जागा. मोक्याची. कपड्यांची शोरूम. पुरेसं भांडवल. पुरेसा काॅन्फीडन्स. लवकरच सुरू होईल.

       लंबी रेस का घोडा था वो.. मुझे चलते जाना है ! स्लो बट स्टेडी. शुभम् भवतु!

      हे दुकान...? त्याच्या धावपळू जोडीदाराला हॅन्डओव्हर करायचं.

       ती. गोग्गोड हिमगौरी सुंदरा. भूलोकीची अप्सराच जणू. एकदम क्युटीफूल. त्याच सोसायटीत राहणारी. तन भी सुंदर, मन भी. हुश्शार, गोड पोरगी. आई बापाची एकुलती एक. ती स्वतः नोकरी करणारी. एका MNC त चांगल्या पोस्टवर, तरीही जमिनीवर.

       गेली दोन तीन वर्ष बघतीय ती त्याला. त्याची धावपळ, त्याची जिद्द, त्याचा स्वभाव. त्याची नजर, निरागस निर्मळ. मुलींशी, बायकांशी अतिशय नम्रतेने बोलायचा तो. कीप सेफ डिस्टन्स. आॅलवेज...

      तसा काळासावळाच होता तो. गावाकडे लहान असताना तालमीत घामगाळू मेहनत केलेली. आत्ताही व्यायाम चालूच होता. दणकट मजबूत स्टील बाॅडी. आवड्याच तिला.. तो. दिलसे.

      सोसायटीतली ती एकटीच बहुधा, जी स्वतः त्याच्या दुकानापर्यंत जाणारी. आधी आळस नको म्हणून.. नंतर. तिथं जायला आवडायचं, म्हणून. त्या वेडूला काहीच समजायचं नाही. प्रेमाच्या बाबतीत एकदम अनपढ.

     तीचा प्रश्नच नव्हता. 'माझा होशील काय ?'

      तो एकदम गडबडलाच. ऊंच जीनेसे धप्पकन खाली पड्यासारखं. "काय पाहिलंस माझ्यात ?" त्याला हेच विचारायचं होतं. चान्सच मिळाला नाही.

       पुढचं सगळं पटाटा. तिच्या आईबाबांचा लेकीवर पूर्ण विश्वास. तिचाही स्वतःवर. त्याच्या आईबाबांची समजूत जरा ऊशीरा पटली. टॅ टॅ ट्या टॅ ट टॅऽऽट्या.. गुँज ऊठी शहनाई.. शुभमंगल सावधान.

       तिथूनच जवळ एका सोसायटीत वन बीएच के घेतलाय त्यानं. सध्या भाड्यानेच. चालतंय की..

       काल एक छोटीशी पार्टी. तिच्या आॅफीसची गँग. तिचा बाॅस, कलीग्ज. सगळं आॅफीस हजर.

       त्याला सवयच नव्हती याची. लग्नात निळा सफारी शिवलेला. तो घालूनच गेला तो तिथं.

       काय दिसत होती ती.. तिच्या शेजारी तो. ब्लॅक अॅन्ड व्हाईट काॅम्बी. सगळ्यांचे चेहरे वाचले तिने. सगळ्यांनी काहीतरी छान गिफ्टलं दोघांना..

       माफक ड्रिंक्स ईतरांसाठी. ती दोघं त्या वाटेवरचे वाटसरू नव्हतेच कधी. मंद म्युझीक. छानसं जेवण. खिदळाट. तो जरा अवघडलेला. तरीही खूष.

       एकदम फिल्मी  अनाऊन्समेंट. "लेडीज अॅन्ड जेन्टलमन. मे आय हॅव यूवर अटेन्शन प्लीज."

      सगळ्यांनी कान टवकारले. ती बोलत होती. "थँक्स अ लाॅट. तुम्ही सगळे आलात, मला खूप बरं वाटलं. हाऊ ईज माय हब्बी ?"

     छोटासा पाॅझ घेतला तिनं. सगळ्यांच्या रिअॅक्शन्स वाचल्या तिनं. "आय नो... मला माहित्येय मी कशी आहे. दिसायला मी छान आहे. ईज ईट माय फाॅल्ट ? तुमच्या सगळ्यांचे डोळे स्कॅन करता येतात मला. जे फाॅर जेलसी. एस फाॅर सेक्सी. सगळं वाचता येतं मला. चलता है.. ईटस् ह्यूमन नेचर.

       तरीही तुम्ही सगळे खूप छान आहात. कुणीही आपल्या बाऊंड्रीज क्राॅस केल्या नाहीत कधी. ग्रेट. बाकी मन ही मन में... वो छोड दो.

       माय हब्बी..? वन्स अगेन. आय कॅन स्कॅन यूवर एक्स्प्रेशन्स.. "बंदर के हाथ अंगूर." "हम क्या ईतने बुरे थे ?"

       तुम्ही वाईट नव्हताच कधी. तो खूपच हॅन्डसम आहे. माझ्या चेहऱ्यामागच्या फिलींग्ज वाचता येतात त्याला. त्याचं केअरींग नेचर आणि निरागस, निरपेक्ष प्रेम. तेच आवडतं मला..

       और एक बात. त्याची तबीयत, स्टील बाॅडी. तीन चार लोगोंको तो पक्का भारी पडेगा वो. बच के रहना लोगो. अजून काय हवं ?

       बाकी त्याच्या फिल्डमधे तो डाॅन आहे. नोकरी करणारा नाहीये तो. नोकरीला लावणारा. म्हणूनच तो आवडतो मला. आय लव्ह माय हब्बी व्हेरी मच..."

       सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे. वो शरमा के मोतीचूर. सगळे जाम खूष.

      तिचा बाॅस. चाळीशीचा असेल. शेवटी तो बोलला. "ग्रेट.. ग्रेट आहात तुम्ही दोघं. मेन विल बी मेन. नेहमी मला काय पाहिजे याचा विचार करतो आम्ही. यूवर हब्बी ईज दी मोस्ट हॅन्डसम गाय. मुलीच्या मनातलं ज्याला ओळखता आलं तो  सगळ्यात हॅन्डसम. हिअर आफ्टर वीई आॅल विल काॅपी हिम.. बेस्ट आॅफ लक. विश यू हॅपी मॅरीड लाईफ."

      बाॅस ईज बाॅस. त्याचं म्हणणं पटलंच सगळ्यांना..

      एकदम म्युझीक चेंज. गरबा अॅटमाॅसफीअर.. ढोल बाजे रे.. सगळे आनंदाने डान्सू लागले. तो भारी नाचतो राव...

      दुसऱ्या दिवशी आॅफीस ग्रुपवर हेच सगळे फोटो. काय कॅप्शन असणार ? 'बंदर के...' अंहं..

      "लक्की गर्ल विथ हॅन्डसम गाय."

धूम मचालो..


_*©कौस्तुभ केळकर नगरवाला.*_

(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता कृपया मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती- मेघःशाम सोनवणे 9325927222.)

_*C/P.*_

फटाके आणि फाटके

 _*🔸फटाके आणी फाटके.🔸*_


_लेखक-अनामिक._


      परवा सहज बाहेर पडलो. दिवाळी तशी म्हटली तर संपली होती. तसंही हल्ली दिवाळी पाच वरून दोन दिवसावर आली आहे...

      म्हटलं.., जरा सकाळी सकाळी फेरफटका मारून येऊ. असाच रस्त्याने एकटा चालत होतो अचानक माझी नजर रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेली ४ ~५ पोरं-पोरी वय जेमतेम ७ ~१०  वयोगटातील असतील... पोरं तशी फक्त चड्ड्या घालूनच होती आणि त्या पण बऱ्याच ठिकाणी फाटलेल्या नायतर ठिगळं जोडलेल्या. पोरींची कपडे पण तशी ठिगळांचीच जास्त होती...

      प्रत्येकाच्या हातात झाडू होता आणि ते रस्त्याला पडलेले फटाक्यांचे कागद झाडून काढत होती. जेवढा आनंद आमच्या पोरांच्या चेहऱ्यावर फटाके फोडताना दिसत असतो त्यापेक्ष्या दुप्पट त्यांच्या चेहऱ्यावर होता. जणू त्यांच्यातच शर्यत लागली होती, जास्त कचरा कोण साफ करतोय...

      मला कुतुहल वाटलं. त्यांचा उत्साह आणि ती धावपळ पाहून ..

       मी सहज रस्ता पार करून त्यांचेकडे गेलो. सर्वांना बोलावले आणि विचारले, ”का रे एव्हढी का गडबड सुरु आहे तुमची..?”

       हे ऐकून त्यातला एक पोरगा म्हंटला, ”आमचे आई- बाप रस्त्याची साफ सफाई करतात. आम्हाला दिवाळीची सुट्टी आहे, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय, जो जास्त झाडलोट करेल त्याला भरपूर दिवाळी फराळ आणि नवीन कपडे मिळतील. आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या कचऱ्याचे वेगळे वेगळे ढीग करायचे. मंग आमचे आय - बाप त्यात काय फटाके असतील तर ते आम्हाला शोधून वाजवायला देणार.”

       हे ऐकून मी सुन्न झालो… त्यातून मी सावरून सहज विचारले, ”अरे तुम्हाला तर फटाके ह्यातले शोधून देणार मग तुम्हाला नवीन कपडे आणि फराळ कसा काय देऊ शकतात ते..?”

      त्यांच्यातली सगळ्यात मोठी पोरगी बोलली, ”काका, ते आमचे आई बाप झाडू मारत मारत जे बी घर रस्त्यात येतं, त्यांना विचारतात काय फराळ उरले असेल तर आमच्या पोरासनी द्या. कुणी देतो, कुणी असूनही हाकलून देतं..

       काही लोक लय चांगली असतेत, ते न इचारता देतात.. कपड्याचं पण तसंच. कुणी चांगली कापड देतं, कुणी फाटलेली... मग आमची आई त्याला जमत असलं, तर शिवते नायतर ठिगळ लावून देते. आणि मंग आम्ही ती आमची दिवाळीची कापडं म्हणून वरिस भर घालून फिरतो.”

      हे माझ्यासाठी खूप भयानक होते, असंही असू शकते, ह्यावर माझा विश्वास बसेना. माझ्या पाया खालची जमीनच सरकली…. सुख - समाधान कशात असतं..!! हे मला ह्या १० वर्षाच्या पोरांनी  दोन मिनिटात शिकवलं होतं...

      नाहीतर आम्ही १०० ची माळ आणली तरी त्या मोजत बसतो आणि १~२ फटाके जरी उडले नाही किंवा आवाज जरी कमी वाटला तरी सणासुदीला पण त्या दुकानदाराचा उद्धार करत बसतो... कपडे तर आम्ही AC शोरूम शिवाय घालतच नाही. त्याशिवाय दिवाळी होतंच नाही असा आमचा गैरसमज असतो.

      कुठं ते AC त गारठलेले कपडे आणि कुठं ती ठिगळांची कपडे... ज्यातून गारठापण रोखला जात नाही... पण त्यासाठी त्या छोट्या जीवांची चाललेली धडपड.. 

      त्यांची धडपड आणि आमची धडपड पाहून एकच फरक जाणवला, ते आनंदानं समाधानाने मिळेल तेच सुख मानणारी वाटत होती, पण आमची धडपड हि कधीच आनंदी वाटली नाही, कधी चेहऱ्यावर समाधान दिसलेच नाही. पण धडपडत राहत जायचे हेच आम्हाला माहिती. कारण आम्हाला सुख कशात आहे हेच समजत नाही..

       मी तसाच मागे फिरलो… घरातले सारे डब्बे शोधू लागलो. मिळेल तो फराळ पिशवीत घातला, पोरांची मिळतील ते ५~६ कपड्याचे जोड, बायकोच्या कपाटातल्या ढीगभर साड्यातल्या ३~४  साड्या, माझी काही कपडे एका पिशवीत भरली आणि थेट त्या पोरांकडे निघालो...

     इकडे माझं काय सुरु आहे, हे माझ्या बायको पोरांना समजत नव्हते. त्यांचा तिकडे दंगा सुरु होता आमचे कपडे, खाऊ घेऊन गेले…

       मी ते सारं त्या पोरांना दिलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं..

       मी परत फिरलो आणि जाता जाता त्यांना सांगितलं इथून पुढं कोणत्याही सणाला माझ्या घरी यायचं आणि इथून पुढे तुम्हाला दिवाळीची नवीन कपडे, फराळ आणि फटाके दरवर्षी मी देत जाईन...

       माझे डोळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पाण्यानी डबडबलेले … स्वतःला सावरत घरी आलो..!!

      आता माझी बारी होती. मला घरी उत्तर द्यायचे होते… मी घरी पोहचणार तोच दारात सारी मंडळी उभी होती. मी तसाच पायरीवर बसलो दोन्ही मुलांना जवळ घेतलं. बायको फुगून दाराला टेकूनच उभी होती. 

       मी मुलांना जे काय पाहिलं ते सगळं सांगितलं. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे भारीतभारी कपडे, दागिने, सुगंधी साबण आणि सुगंधी उटणं लावले तरच दिवाळी होते असं समजून आपण विनाकारण किती वायफळ खर्च करतो आणि समाजात असे किती तरी लोक आहेत  ज्यांना साधं साबण, तेल अश्या साध्या साध्या, त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत... हे समजावू लागलो.

      तुम्ही २ फुलबाजे कमी घेतले, तरी रुसून बसता. पण ती मुलं तुमच्या उडवलेल्या फटक्याच्या ढिगातून एकादी न उडलेली फटाकी मिळेल ह्या आशेने मन लावून तुम्ही केलेला कचरा साफ करत आहेत... हे समजावण्याचा प्रयत्न करत होतो..  

      ती पोरं रस्ता झाडत झाडत आमच्या घराजवळ आली होती.. आमच्या घरचे सारे एकटक लावून त्यांचेकडे पाहत होते.

      साऱ्याचे चेहरे पडले होते. तोच माझा छोटा मुलगा माझ्या जवळुन उठला आणि थेट घरात गेला, आणि लपवून ठेवलेले एक टिकल्याचे पॅकेट आणि बंदूक घेऊन बाहेर आला नि सरळ त्या पोरांकडे गेला आणि त्यांना दिले…

       हे पाहून त्या पोरांनी काम सोडलं आणि जणू काय आपल्या हातात हजाराची माळ पडल्यासारखे एक-एकजण ते टिकल्या बंदुकीत घालून वाजवत नाचू लागले…

      माझा मुलगा तसाच पळत आला नि माझ्या कुशीत बसून रडायला लागला. त्याला काय समजलं मला माहिती नाही आणि मी हि त्याला विचारणं मुद्दाम टाळलं, काहीही असेल... तरी एक वात पेटली होती त्याची मला जाणीव झाली होती.. 

      ह्या साऱ्यातून एक गोष्ट मला आणि माझ्या कुटुंबाला समजली ती म्हणजे “फटाके” आणि “फाटके” ह्यात फक्त एका “काण्याचा” फरक असतो आणि तो “काना” एकाद्या “काठी” सारखा असतो. योग्य ठिकाणी लागला तर साऱ्या गोष्टींचा आनंद देणारा आधार बनतो नाहीतर ते आयुष्याचं ओझं होतो ….

      म्हणून ठरवलं, आता कोणताही सण आला कि अश्या २ का होईना, पण ह्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम करायचे .. फटाके एकदा पेटले, कि एकदा मोठा आवाज करून कागदच होतात पण कोणाच्यातरी चेहऱ्यावर एकदा पेटवलेले आनंदरुपी समाधान आवाज न करता पण एखाद्या रंगीत फुलबाज्या प्रमाणे फुलत राहतात.

_*लेखक-अनामिक.*_

अवघा रंग एकचि झाला

 #लघुकथा

अवघा रंग एक झाला..(repost)

©स्वप्ना...

    सावळी आज येणार नाही आजीच्या बहिणीच्या नातीने शेजारच्या गॅलरीतून ओरडून  निरोप दिला,... ते ऐकून आजी अस्वस्थ झाल्या,...पडल्या पडल्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं आता आपलं नॅपकिन कोण बदलणार ..?खरंतर सावळीमुळे आपण एवढं व्यवस्थित राहू शकतो आणि सावळी येणार नाही म्हणते पण का काय झालं,..?अगतिक होऊन चिडून ओरडून आजींनी विचारलं ,..त्यावर  नात म्हणाली,.. आजी कर्फ्यु लागला आहे रस्त्याने जीवावर उदार होऊन येते ती गेल्या 15 दिवसांपासून तुम्हाला काय माहिती?? हो बाहेर काय वातावरण आहे ते,...एवढं बोलून ती नात आत निघून गेली,...आजीला जाणवायला लागलं खुपच उष्ण पाणी आपल्या गालावरून ओघळतंय आपल्याला आता खरंतर मरून जावं वाटतंय,..देवा काय खेळ लावला आहेस रे ह्या जीवाचा..? लवकर सम्पव तरी अरे आमच्या सारखी मरण मागणारी माणसं सोडून तरुण लोक घेऊन चालला न्याय कुठे तुझा,...?तेवढ्यात आजीला लॅच उघडल्याचा आवाज आला,..आजी ओरडली ,..भयभीत होऊन कारण चावी फक्त सावळीकडेच असते,..आणि आताच तर निरोप असा आजी विचार करत होती तर समोर गोड हसणारी सावळी,.. आजी म्हणाली," काय गम्मत करतेस का ग माझी म्हातारीची??"सावळी ओढणी कमरेला बांधत म्हणाली,..गम्मत केली नाही माझ्या बापाने केला होता तो फोन कारण खरंच बाहेर वातावरण खराब झालं आहे,..बाप म्हणतो लग्न आहे तुझं,...काही झालं तुला तर,..?

       ऐकून आजीला हुंदकाच फुटला आणि आजी चादरीत तोंड लपवून रडू लागली,...सावळे किती करतेस ग माझ्यासाठी,...?नक्की आज पण भांडून आली असशील घरच्या लोकांसोबत,...सावळीने लगेच आजीचा हात हातात घेतला,..आजी रडू नका तुमचे खुप उपकार आहेत माझ्यावर त्यासाठी हे करणं तर काहीच नाही,..चला उठा स्वच्छ व्हा छान सावळीच्या मदतीने आजी अगदी प्रसन्न तयार होऊन मस्त बसली ,...आपल्या काळ्याभोर विठ्ठल मुर्ती समोर,...सावळीची सगळी लगबग सुरू होती,..छोट्याश्या मूर्तीला तुळशीहार तयार होता,.. त्याच्या समोर पुसून नाजुक रांगोळी रेखाटली होती,...चांदीची  निरंजन चकचकीत घासुन साजुक तुपाने गच्च भरलेली शांतपणे तेवत होती ,...आजी शांत मनाने जप करत होती,..स्वयंपाक घरातुन सावळी बाहेर आली चहा घेऊन,... आजीने चहा घेताना विषय काढलाच,..".सावळे तू नस्तीस तर काय झालं असतं ग माझ्या म्हातारीचं,...?? नुसता पैसा असुन उपयोग नसतो बघ ...आयुष्यात मायेनं जवळ घेणारं लागतंच कुणीतरी,...नुसतं रक्ताच्या नात्याचं नाही ग बाई मनाच्या नात्याचं,..हो किनी ग,...जशी मला तू,...!"

             सावळी म्हणाली आजी,..".हे सगळं तुम्ही जीव लावला म्हणून आहे,..टाळी एका हाताने वाजत नाही,...आजी मला आजही आठवतं,.. एक तर पोरगी आणि त्यात काळी म्हणून बाप चिडत होता,..मारत होता,..म्हणून आई तुमच्याकडे कामाला येताना घेऊन यायची,.. तुमच्या मनाला पाझर फुटला माझं शिक्षण केलं,...आज मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे ती तुमच्यामुळे आणि मग माझं शिक्षण जर तुमच्या कामाला नाही आलं तर काय उपयोग हो,...मध्ये आई गेली तेंव्हा तर खरा आधार पैशानं, मनानं तुम्ही दिला मला,...आणि त्या पैश्यापेक्षा संस्काराची शिदोरी दिलीये आजी,...तुमच्याकडे असलेले सणवार,भजन,पुजा आनंद कसा मिळवावा ते शिकवून गेले,...ते सगळं मला अनुभवू दिलंत तुम्ही,...आजोबांना जाऊन वर्ष पण झालं नाही तर तुम्ही अश्या पॅरॅलीस झाल्या,... तुम्हाला मुलबाळ नसलं तरी तुम्ही मला मुली सारखंच जपलं ना,...मग माझं कर्तव्य मी करतीये आणि करणार,...होणाऱ्या नवऱ्याला पण सांगितलं आहे मी,... सकाळचे दोन तास माझे आजीसाठी आहेत खास लग्नानंतर सुद्धा,...म्हणुन सांगते आजी तुम्ही काळजी करू नका,...मी येते बरोबर कशीही,... मला माहित आहे मी गेल्यावर तुमच्या बहिणीची नात जी वर राहते ती येते तुमच्या मदतीला,... पण तुम्हाला पण मी येऊन गेल्या शिवाय करमत नाही ना,???"...दोघी हसल्या,...

            हसता हसता आजीच्या डोळ्यात पाणी आलं,...आजी म्हणाली,.."सावळे तू हि विठ्ठल मुर्ती दिली आणि तेंव्हा पासुन मला तू सतत जवळ असल्यासारखं वाटतं,... तू तशी फार हुशार मी केलेल्या सगळ्या पंढरपूर वाऱ्या तुला माहीत होत्या,... पण ह्या 3 वर्षापूर्वी गुढग्यांच्या दुखण्याने मला वारीला जाता नाही आलं म्हणून मी नाराज होते तर तू चक्क हि मूर्ती आणून ठेवली माझ्या हातात,...काळीभोर आणि शांत,...

        बरं आजी आता जाऊ का मी,..."आहो माझी आजीसासू सिरीयस आहे म्हणून लग्न उद्याच करायचं ठरलंय,... हे लॉकडाऊन काही उघडत नाही म्हणून घरातच करणार आहे ,...उद्या फक्त धकवून घ्या,...परवा येतेच मी  आशीर्वाद द्या मला,...आजीला गहिवरून आलं,..सगळ्यांनी काळी म्हणून हिणवलेलं लेकरू,...कष्टाळू आणि प्रामाणिक होतं,... उद्या तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती,...तिला जवळ घेत आजी म्हणाली काय देऊ ग तुला,...?तशी सावळी म्हणाली,..".आनंदी रहाण्याचा आशीर्वाद बस बाकी काही नको,..."

               आजीला तेवढ्यात काहीतरी आठवलं,...आजी म्हणाली,"सावळे तू खरेदी केली कि नाही तुला माझ्या त्या पैठणी लुगड्यासारखं लुगडं घालायचं होतं ना ,...आणि त्यावर मोत्याची नथ,..."

सावळी हसली आणि म्हणाली,"आजी हे लॉकडाऊन इतकं झटपट झालं ,...खरंतर आईने पैसे साठवून ठेवले होते मला तस पैठणी लुगडं घ्यायला पण आता राहिलं,... जाऊ द्या,... नंतर घेऊ चला येऊ मी,..?"

         आजी म्हणाली," थांब ते कपाट उघड,...ती खालच्या कप्प्यात सुती कापडाची घडी आण इकडे,..."

         सावळीने पटकन ती घडी ठेवली हातात,...आजींन त्यातुन लालचुटुक पैठणी काढली,...आणि सावळीला म्हणाली," घाल लग्नात,... आणि परवा मला आणुन दाखव कशी दिसली ते,..."

तशी सावळी म्हणाली," आजी,... अहो मी तुमच्यासारखी पैठणी घेणार होते पण रंग हा नाही अहो माझ्या सारख्या काळीला चांगली तरी दिसेल का,..?"

           आजी म्हणाली सावळे,..."अग माणसाचा कातडीचा रंग गौण असतो ग,...त्याच मन ज्या रंगाचं असतं ना,..त्यावर त्याच सौन्दर्य असतं,.... म्हणजे,.... कपटी,धूर्त,प्रेमळ,निरागस असे वेगवेगळे रंग असतात त्यावर विचार करायचा,...आणि आता मला सांग ह्या विठ्ठलाचं वस्त्र कोणत्या रंगाच आहे ग,...?"

        सावळी हसुन म्हणाली ,"अगदी असंच लाल,..."

   आजी लगेच म्हणाली,...मग त्याला ते वाईट दिसतंय का,???

        सावळी म्हणाली," आजी तो देव आहे,...त्याला चांगलंच दिसणार,..."

          आजी हसली म्हणाली,..."सावळे देवत्व मूर्तीत नसतं असं नाही पण मूर्तीशिवाय जेंव्हा ते बघायच असतं ना तर ते,...माणसाच्या कृतीत,कष्टात,स्वभावात बघायच असतं,... आता ह्या महामारीच्या काळातच तर तू म्हंटली ना,...हे शेतकरी, पोलीस,नर्स,डॉकटर,सफाई कामगार अगदी देव बनुन पृथ्वीवर वावरत आहेत म्हणून,..."

         सावळीने दोन्ही हात कोपऱ्यापासून जोडले आणि आजीला म्हणाली,"बोलण्यात मी तुम्हाला काही हरवू शकणार नाही,...द्या ते लुगडं मी परवा नेसुन आणि नवऱ्याला घेऊन येईल आशीर्वाद घ्यायला आणि सेवेला पण येईन,...जाऊ का आता,...??आजीने नथीची डबी पण ठेवली हातात,..तशी ती घाबरत म्हणाली,सोन्याची आहे आजी हि नथ मला नको,...आजी म्हणाली "घालुन परत आणुन दे मग तर झालं,...अग पैठणीवर शोभुन दिसेल,..."

         सावळीचे डोळे पाणावले,...ती पटकन आजीच्या गळ्यात पडली,...आणि चटकन निरोप घेऊन निघाली,..

         आजी हताशपणे पडून राहिली,...विठ्ठलाकडे पहात,...

         तिसऱ्या दिवशी लालचुटूक पैठणी घालुन नवऱ्यासोबत ती आजीच्या अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरली तसं आजीच्या नातीने तिला वर ये म्हणून हाक मारली,...सावळीला खरंतर आधीआजीला भेटायचं होत पण आधी तिच्याकडे जावं लागलं,...

         नातीने दरवाज्यातच तिला थांबवलं,...तोंडाला मास्क बांधूनच ती बोलत होती,..तिने सावळीला आजीच्या फ्लॅटची चावी मागितली आणि म्हणाली सावळे",... अग परवा तू गेल्यावर काही तासात आजी गेली अग,...तू केलेलं जेवण द्यायला मी फ्लॅटमध्ये गेले तर आजी रडत होती,...मला म्हणाली,..." माझ्या सावळीच लग्न आहे,...तिला दिलेली पैठणी आणि नथ तिला माझी आठवण म्हणून सांग ,...मी जवळ बसले तर मला म्हणाली,ती विठ्ठल मूर्ती दे माझ्या जवळ,...त्या मूर्तीला कवटाळून म्हणत होती खरं सांग तूच सावळी बनून येत होतास ना,...आणि प्राण सोडले ग तिने,...

         सावळी सुन्न होऊन गेली,...नवऱ्याने तिला सावरलं,...ती निघाली आणि निघताना म्हणाली त्या नातीला मला ती विठ्ठल मूर्ती देता का???नातीने लगेच फ्लॅटचे कुलूप उघडून ती मूर्ती तिच्या हातात दिली,...सावळी विठ्ठल घेऊन चालू लागली,...पण सावळीच्या मनातला प्रश्न विठ्ठल ऐकत होता,...

     सावळी मनात म्हणत होती,.."आजी तुझी सेवा केली म्हणून मी तुझा विठ्ठल कि तू मला चांगलं जगणं दिलंस म्हणून तू माझा विठ्ठल,..??"


          माणुसकीचा हा अवघा रंग एक झालेला पाहून विठ्ठलमूर्ती हसुन म्हणत होती,... अवघा रंग एक झाला..

    

   वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..शुद्धलेखन चुका माफी असावी असेच blogs वाचण्यासाठी swapna blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा,...धन्यवाद..

       

  ©स्वप्ना मुळे(मायी) औरंगाबाद

विश्वास

 *" घंटा उचलेपर्यंत थांबा "*


*" चिमणीचा विश्वास "*


🙏🙏🙏👌👍👌🙏🙏🙏


कौरव-पांडवांमध्ये होणा-या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते.

 हत्तींच्या मदतीने विशालकाय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते. मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती. एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिल्लांसह राहात होती. तो वृक्ष जमीनदोस्त झाला आणि तिचं घरटं, उडताही न येणा-या इवल्या पिल्लांसह कोसळलं.


पण आश्चर्यकारकरीत्या ती पिल्लं अजूनही सुखरूप होती.

घाबरलेल्या, हताश चिमणीने, तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिले.

युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरचना ठरविण्यासाठी ते तिथे आले होते.


दुबळ्या पंखांत, सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णांच्या रथाकडे उड्डाण केले.


"हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचव!  या भयंकर युद्धात ती चिरडली जातील." तिनं विनवलं.


"तुझं दु:ख मला कळतंय, पण मी निसर्गनियमात ढवळाढवळ करू शकत नाही." श्रीकृष्ण म्हणाले.

"मला इतकंच माहीत आहे, की तुम्ही माझे तारणहार आहात. माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे. त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं, हे आता तुम्हीच ठरवा."


"कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहातं," श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते. असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाही.


"हे तत्त्वज्ञान मला कळत नाही. मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्हीच आहात, मी तुम्हाला शरण आले आहे." चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती.


"मग असं कर, ३ आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर."  श्रीकृष्णांनी सांगितलं.

सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन चिमणीला हुसकावणार, इतक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करताना त्याला दिसले.

चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली.


दोन दिवसांनंतर, शंखनाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले. या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणा-या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच; शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होता.

"मला आज्ञा करावी, माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही."

अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वत:कडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला.  पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या. 


एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही.

"मी करू का..??" अर्जुनाने आर्जव केले. 


त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.


"पण तुम्ही केशव हत्तीवर वार का केलात..??" अर्जुनाने विचारलं.

"कारण चिमणीचं नांदतं घरटं असणारं झाड त्याने पाडलं होतं."

"कोण कुठली चिमणी ती..!!"


 अर्जुनाला काही कळेना...


 "आणि एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे, फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून पडलीय."


अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत, श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली.


युद्ध सुरू झालं, पुढच्या अठरा दिवसांत अनेकांची आयुष्यं संपली. अखेर पांडवांचा विजय झाला. परत एकदा, त्या रक्तलांछित युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले. अनेक योद्ध्यांची कलेवरे अंत्यसंस्कारांची वाट पाहात अजूनही तिथेच पडलेली होती. छिन्नविच्छिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य, युद्धात मारले गेलेले हत्ती, रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांचा तिथे खच पडला होता.


एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहात राहिले.

"अर्जुना, माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का?" श्रीकृष्ण म्हणाले.

या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला. 


एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना, एक क्षुल्लकसा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत, हे न कळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णांकडे पाहू लागला.


"हां...हीच ती घंटा, मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती." श्रीकृष्ण म्हणाले.


अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता, त्याने ती जडशीळ घंटा उचलली. आणि त्यानंतर, त्याने जे पाहिले त्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले. 

एक, दोन, तीन, चार आणि पाच: चार छोट्या चिमण्यांपाठोपाठ एका प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली. आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली. निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवले होते.

अर्जुन म्हणाला, "मला क्षमा करा, श्रीकृष्णा! मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखंच वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलो होतो."


*"घंटा उचलली जाईपर्यंत घरामध्ये आतच थांबा...!!"*


*सुरक्षित रहा...!!*


*"कोरोनाला पळवू या...!!"*


*आपल्या तसेच आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!!*


🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹