Friday, 14 April 2017

लग्न एक संस्कार



* लग्न एक पवित्र संस्कार! *

(सर्व विवाहित व नवविवाहितांना समर्पित पोस्ट!)

© अनिल जाधव शिरपूरकर.


भारतीय पध्दतीचे लग्न!
पाणिग्रहण!!
सोळा संस्कारांतील एक संस्कार!  
दोन जीवांचेच नव्हे तर दोन कुटुंबांचे मिलन!
अग्नीदेवता, देव-ब्राम्हण, कुटुंबीय आणि समाज या सर्वांना साक्षी ठेवून, अग्निदेवतेभोवती सात प्रदक्षिणा घालून दोन शरीरे, मने आणि आत्मे ज्या पवित्र बंधनाने गुंफली जातात ते दोन जीवांचे जन्मोजन्मींचे बंधन! 

हिंदू धर्मशास्रानुसार मानवी जीवनात एकूण ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम , संन्यासाश्रम व
वानप्रस्थाश्रम असे आश्रम असतात.
त्यांतील गृहस्थाश्रमासाठी "पाणिग्रहण"  म्हणजेच लग्न हा संस्कार स्थिर व आदर्श मानवी जीवनासाठी  अत्यावश्यक आहे!

   भारतीय संस्कृतीनुसार मातृ-पितृ ऋण, गुरु ऋण, समाज ऋण व देश ऋण मानले जातात.

यांपैकी माता-पिता, गुरु, समाज व देश यांच्या सेवेतून ही ऋणे काही प्रमाणात फेडली जातात मात्र यांच्या सेवेच्या जोडीला कौटुंबिक प्रगती, समाजाची प्रगती व देशाची प्रगती ही ऋण फेडण्याची माध्यमे आहेत!

   हिंदू धर्मीय विवाहाचा मुख्य उद्देश म्हणजे 
आपल्या पोटी संतान जन्माला येवून, आपल्या वडीलांचा वंश पुढे चालविणे. 

    अशाप्रकारे आपल्या वडीलांचा वंश पुढे चालविणे हेच खरे पितृ ऋणातून मुक्त होण्याचे मुख्य लक्षण मानले जाते! 

 आणि यासाठी हिंदू विवाहानंतर पतिपत्नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध हा वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे! म्हणूनच  हिंदू विवाहात पतिपत्नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे!

हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्नींदरम्यानचा तथाकथित  संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. (अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो.)

संसार रथाची पती व पत्नी ही दोन चाके मानली जातात.  

ही दोन्हीही चाके जेव्हा समसमान समर्पणातून संसाराचा रथ यशस्वीपणे ओढतात, तेव्हाच तो संसार हा सर्वांत सुखी संसार मानला जातो!

 म्हणूनच लग्न आपल्या हिंदू धर्माचा एक पवित्र संस्कार आहे! 

भारतीय लग्न हे जणू आपल्या सुखी जीवनाचा दर्पण आहे!

भारतीय लग्न पध्दतीमूळे नवरा-बायकोंची परस्परांची सुख-दुःखे जीवनभरासाठी जणू
एकमेकांना अर्पण केलेली आहे! 

भारतीय लग्न हे खरेतर नुसत्या दोन जीवांचेच नव्हे, तर दोन भिन्न  कुटुंबांचे मिलन आहे!

भारतीय लग्न हे दोन जीवांचे परस्परांना कायमस्वरुपी केलेले समर्पण आहे,

अशा अर्थाच्या काव्याने आपली सांगता करुन, आपला निरोप घेतो! 

* लग्न एक पवित्र संस्कार! *

लग्न एक पवित्र संस्कार, 
सुखी जीवनाचा दर्पण;
परस्परांची सुख-दुःखे, 
एकमेकांना ती अर्पण!

लग्न हे खरेतर मिलन,
दोन जीव न् कुटुंबांचे;
दोन जीवांचे परस्परांना,
हे कायमस्वरुपी समर्पण!



© अनिल जाधव शिरपूरकर.

पदर

• स्त्रिचा पदर •• 
    पदर  काय  जादुई  शब्द  आहे  
               हो  मराठीतला ! 

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन 
             अक्षरी  शब्द. 

             पण  केवढं  विश्‍व
      सामावलेलं  आहे त्यात....!!

     किती  अर्थ,  किती  महत्त्व... 
     काय  आहे  हा  पदर.......?

साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर
रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा
भाग.......!!
तो   स्त्रीच्या   लज्जेचं   रक्षण   तर
करतोच,   सगळ्यात   महत्त्वाचं  हे
कामच   त्याचं.   पण,   आणखी   ही
 बरीच  कर्तव्यं  पार  पाडत  असतो.

 या   पदराचा   उपयोग  स्त्री  केव्हा,
    कसा  अन्‌  कशासाठी  करेल, 
        ते  सांगताच  येत  नाही. 

सौंदर्य   खुलवण्यासाठी   सुंदरसा
पदर   असलेली    साडी   निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान
पदरांची   जणू   स्पर्धाच   लागलेली
असते.  सगळ्या  जणींमध्ये  चर्चाही
 तीच. .....!!

लहान  मूल  आणि   आईचा  पदर, 
हे   अजब  नातं  आहे.  मूल  तान्हं
असताना   आईच्या   पदराखाली
जाऊन  अमृत   प्राशन  करण्याचा
 हक्क   बजावतं. .....!!

जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ
 लागलं,  की  त्याचं  तोंड  पुसायला
आई  पटकन  तिचा  पदर  पुढे  करते
....

मूल   अजून   मोठं   झालं,   शाळेत
 जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चाल-
ताना  आईच्या  पदराचाच  आधार लागतो.   एवढंच   काय,   जेवण 
  झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल
ऐवजी  आईचा  पदरच  शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा
वाटतात  मुलानं  पदराला  नाक  जरी 
पुसलं,  तरी  ती  रागावत  नाही ...

त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले 
तर मुलांना पटकन  लपायला आईचा पदरच  सापडतो.....!! 

महाराष्ट्रात  तो  डाव्या  खांद्या  वरून 
 मागे   सोडला  जातो.....!!

तर  गुजरात,  मध्य प्रदेशात  उजव्या 
 खांद्यावरून       पुढं     मोराच्या. 
 पिसाऱ्यासारखा   फुलतो ....!!

काही   कुटुंबात   मोठ्या   माणसांचा
 मान  राखण्यासाठी   सुना  पदरानं
चेहरा  झाकून  घेतात ..
 तर  काही  जणी  आपला   लटका ,
राग     दर्शवण्यासाठी     मोठ्या 
फणकाऱ्यानं   पदरच   झटकतात !

     सौभाग्यवतीची  ओटी  भरायची
ती  पदरातच  अन्‌  संक्रांतीचं   वाण
 लुटायचं   ते  पदर   लावूनच.

बाहेर   जाताना   उन्हाची   दाहकता
थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर 
ओढला  जातो,  तर  थंडीत  अंगभर 
पदर   लपेटल्यावरच   छान   ऊब 
मिळते....!!

काही   गोष्टी   लक्षात   ठेवण्यासाठी
पदरालाच   गाठ   बांधली   जाते .
अन्‌   नव्या   नवरीच्या   जन्माची 
गाठ   ही   नवरीच्या   पदरालाच, 
नवरदेवाच्या   उपरण्यासोबतच
बांधली   जाते.....!!

पदर   हा   शब्द   किती   अर्थांनी 
           वापरला  जातो  ना.....? 

नवी.  नवरी   नवऱ्याशी   बोलताना 
पदराशी  चाळे  करते, पण संसाराचा 
संसाराचा  राडा  दिसला,  की  पदर
कमरेला   खोचून   कामाला   लागते 

देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?
माझ्या   चुका  " पदरात "  घे.‘

मुलगी मोठी  झाली,  की  आई  तिला 
साडी   नेसायला   शिकवते,  पदर
सावरायला   शिकवते   अन्‌   काय
 म्हणते  अगं,  चालताना  तू  पडलीस
 तरी  चालेल. ....!!

पण,   " पदर "  पडू   देऊ   नकोस !
अशी  आपली  भारतीय  संस्कृती.

 अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य
मुलींचा   विनयभंग  तर  दुरच्   ती. रस्त्यावरून     चालताना     लोकं
तिच्याकडे   वर  नजर  करून  साधे पाहणार   ही   नाहीत   ऊलटे   तिला  वाट  देण्या साठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते  त्या  "पदरात" ....... !!

   🙏🙏🙏🙏🙏सर्व स्त्रीयांना🙏🙏🙏🙏🙏⁠⁠⁠⁠

स्पर्श

स्पर्श! 
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्वचेद्वारे दिलेला भावनात्मक संदेश!  

स्पर्श हा भावनात्मक संदेश असल्याने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या मनात कोणता भाव आहे हे त्या स्पर्श होणाऱ्या व्यक्तीला लगेचच समजते वा समजायलाच हवे! 

म्हणजेच प्रत्येक भारतीयाला चांगला स्पर्श वा वाईट स्पर्श यांचा भावनात्मक संदेश ओळखता यायलाच हवा!

आणि फक्त चांगला भावनात्मक संदेश आपल्या स्पर्शातून इतरांना देता ही यायला हवाच! 

आणि म्हणूनच एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष स्पर्श करते तेव्हा पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात, कारण आपला स्पर्श हा केवळ आदरभावाचाच स्पर्श नव्हे, तर आपल्या स्पर्शातून माणूसकीचा मानसिक आधार  इतरांना मिळायला हवा! 

१) आपल्या कोणत्याही स्पर्शात कधीही विकारभाव नसावा.

२) आपण वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींना चरणस्पर्श करुन त्यांचा आशीर्वाद आपल्या मस्तकी धारण करतो, तेव्हा संबंधित वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींच्या चरणस्पर्शाचा फक्त वरवरचा आव नसावा.

३) आपण कोणता भावनात्मक संदेश आपल्या स्पर्शातून देतोय, हे आपल्या प्रत्येक स्पर्शातून इतरांना समजते आणि आपल्या या प्रत्येक स्पर्शातूनच आपला मूळ स्वभाव ओळखला जातो!

म्हणूनच आपल्या प्रत्येक स्पर्शातून स्पर्श होणाऱ्या व्यक्तीला आदरभाव जाणवेल, असाच भावनात्मक संदेश आपल्या स्पर्शाद्वारे इतरांना जायला हवा!

वरील अर्थाची चारोळी आधी सादर करतो आणि "चरणस्पर्श" एक वरदानात्मक संस्कार या उपविषयाकडे वळतो! 

* स्पर्श आणि चरणस्पर्श! *


कोणत्याही स्पर्शात नसावा विकारभाव,

चरणस्पर्शाचा नको फक्त वरवरचा आव;

हर स्पर्शातून ओळखला जातो स्वभाव,

प्रत्येक स्पर्शातून जाणवावा आदरभाव!


आता वळू या मानवतेच्या सर्वांत पवित्र स्पर्शाकडे! अर्थातच चरणस्पर्शाकडे!

चरणस्पर्श!
डोके नम्रतेने झुकवून, वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तीच्या  पायांना स्पर्श करीत केलेला मनोभावे नमस्कार वा दंडवत म्हणजे चरणस्पर्श होय!

   चरणस्पर्श करतांना आपल्यातील "मी"पणा सोडून "कमी"पणा घेतला जातो, म्हणूनच चरणस्पर्श हा एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला समरसतेने केलेला प्रणिपात होय!

कळत-नकळत कुणाला तरी आपला पाय लागला तेव्हाही आपण नकळतपणे ज्या व्यक्तीला आपल्या पायाचा चुकून धक्का लागलाय, त्या व्यक्तीचाही आपण सहजपणे चरणस्पर्श करतो वा असे करावे! 

            आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ वा विधायक कार्य करण्यापूर्वी वरिष्ठांचे चरणस्पर्श करण्याची एक अतिशय चांगली परंपरा आहे!

   आजही अनेक घरांमध्ये सकाळी उठल्यावर अथवा घराबाहेर जातांना वरिष्ठांचे चरणस्पर्श केले जावून त्यांच्या आशीर्वादाची शिदोरी पुढील कामांसाठी बरोबर नेण्याची पध्दत आहे!


* वरिष्ठांचे वा सन्माननिय व्यक्तींचे चरणस्पर्श केल्याने :

१) वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींबद्दल आपल्या मनात आदर कायम राहतो.

   या आदरातून आपलेपणा तर येतोच, वरुन संबंधित वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्ती
व्यक्तींबद्दल मनात "आदरयुक्त भीती" तयार झाल्याने, या वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींचा मान राखण्यासाठी आपण आपल्या वर्तनात जाणीवपूर्वक  विधायक बदल करतो; त्यामूळेच   भविष्यात आपल्या हातून चुका वा पाप होण्याची शक्यता कमी होते!

२) वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींच्या आशीर्वादरुपी मस्तक व पाठीवरील प्रेमळस्पर्शाने त्यांच्यातील धनात्मक उर्जेचा लाभ प्रत्यक्षपणे आपल्याला मिळतो.

३) वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींच्या हृदयात आपल्याबद्दलच्या सहानुभूती व प्रेमविषयक एक विशिष्ट कोपरा तयार होवून, हे वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्ती आपल्याला केवळ मार्गदर्शनच नव्हे तर हरघडी मदत देण्याच्या मनस्थितीत असतात.

४) कनिष्ठांनी ज्येष्ठांचा चरणस्पर्श केल्याने दोन पिढ्यांमधील अंतर कमी करणारा दुवा तयार होतो; त्यामूळेच दोन पिढ्या समविचाराने एकत्र नांदून कौटुंबिक एकता तयार होते.

५) आपल्या सततच्या चरणस्पर्श करण्याच्या क्रियेने, आपल्या कंबरेची लवचिकता वाढीस लागून शरीरास उत्तम आरोग्य लाभते.

६) आपल्या अंगी संयमातून नम्रता येवून इतरांच्या सेवेची सवय आपल्या अंगी रुजते.

७) "जो झुकतो वा वाकतो तोच या जगी टिकतो", या जीवनसूत्रानुसार आपल्या जीवनाला, वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींच्या कृपाछत्राने एक विशिष्ट स्थैर्य अत्यंत कमी कालावधीत लाभते!

थोडक्यात  "आखडणे" हे प्रेताचे आपल्या व्यक्तिमत्वात दडलेले लक्षण नाहीसे होवून, आपल्या जीवनात "जिवंतपणा" येतो!

    "चरणस्पर्शा"चे वरील सर्व फायदे लक्षात घेता, "चरणस्पर्श" हा एक वरदानात्मक संस्कार आहे हे निश्चित! 

           वरिष्ठांच्या  वा सन्माननिय व्यक्तींच्या चरणस्पर्शाचे विधायक फायदे लक्षात घेवून, वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींना चरणस्पर्श करण्याचा हा भारतीय संस्कार संरक्षित व संवर्धित करुन; हा चरणस्पर्शाचा  संस्कार संक्रमित करणे हिच खरी काळाची गरज आहे! 

शेवटी स्पर्श असो वा चरणस्पर्श,
आपल्या प्रत्येक स्पर्शातून आपल्यातील माणूसकीयुक्त आदर वा भावनिक आधार त्या स्पर्श होणाऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्याकडून पोहोचायला हवा!


© अनिल जाधव शिरपूरकर.

Sunday, 16 October 2016

प्रसार माध्यमे फायदे आणि तोटे


माझा पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार

      

'शिक्षणातले जुनेच वारे आता नव्यानं वाहू पाहतात,गांधी, रवींद्रनाथ, साने गुरुजी पुन्हा नव्याने भेटू पाहतात....शिक्षणाचे नवेच पाझर पुन्हा नव्याने न्हाऊ पाहतात, विवेकानंद पुन्हा भेटून विवेकी - विचार आणू पाहतात,शिक्षण जगवू  - घडवू पाहतात.... स्वीकारू या, अंगिकारू या, हृदया - हृदयापर्यंत नेऊ या... शिक्षणाची अमृतधारा 




'A teacher takes a hand,Open a mind and touches the heart by his teaching'

'Teaching is an art, its not a job.'


            अध्यापन हे आदर्श करिअर मानले जाते. शिकवण्याची मनापासूनची इच्छा आणि शिकवण्याची आवड असणे हा फार आवश्यक आणि महत्त्वाचा गुण आहे या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी आहे. 
                          'जसा कवी जन्मावा लागतो तसाच शिक्षकही जन्मावा लागतो' असं म्हणतात. शिकवण्याची कला ही शिक्षकाची अंगी उपजतच असते म्हणून तेच फक्त शिक्षक व्हावयास लायक असतात असे म्हणतात.                       
                          आपल्याकडील 'वसिष्ठ, सांदिपनी' यांसारख्या ऋषीमुनी किंवा पाश्चात्य 'सॉक्रेटिस, प्लेटो, ऍरिस्टोटल' या सर्व विचहरवंतांनी अध्यापनाचा प्रभावी पाया घालून दिला. त्यांनी घालून दिलेली परंपरा तशीच किंवा त्यासारखी कित्येक वर्षे प्रचलित होती. या परंपरेने एक पाया घालून दिला होता व त्यानुसार अध्यापन हि एक वैशिष्टयपूर्ण क्रिया असून त्यासाठी उच्च बुद्धिमत्ता व कौशल्य लागते. 
        जीवन म्हणजे काय? असे जर कोणी मला विचारले तर 'जीवन म्हणजे संस्कार संचय' अशी मी व्याख्या करेन, असे विनोबा भावे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे. हि संस्कारक्षमता व्यक्तीला अनेक ठिकाणांहुन प्राप्त होत असते. त्या अनेक ठिकाणांपैकी महत्त्वाचे केंद्र म्हणजे शिक्षण होय. शिक्षणातून विद्यार्थी केवळ ज्ञानसंपन्न आणि कौशल्यपरायण झाला एवढ्यावरच संतुष्ट राहणे अपुरे ठरेल. विद्यार्थी मनानेही तेवढाच संस्कारीत झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या मशागतीसाठी कुशल अध्यापकाची गरज आहे.
         कोणतीही कला म्हटली की, त्यात सर्जनशीलता पाहिजे. त्यात नाविन्य पाहिजे. कलेने स्फुर्ती दिली पाहिजे. कलेने परंपरा सांभाळून नव्या वाटा शोधल्या पाहिजेत. हे कलेसंबंधीचे विचार अध्यापन कलेलाही लागू पडतात. शिवाय काळाच्या ओघात जशी कलेची नवी तंत्रे दिसतात, नवे स्वरूप दिसते तशी अध्यापनाची नवी स्वरूपे, तंत्रे नव्या पद्धती विकसित होताना दिसतात. अर्वाचीन काळात शिक्षणाच्या कल्पनाही झपाटयाने बदलत आहेत. 
         पूर्वी शिक्षण प्रक्रियेत शिक्षक केंद्रस्थानी होता तर आता विद्यार्थी केंद्रस्थानी आहे. पूर्वी श्रवणशक्ती, घोकंपट्टी रूढ होती. आता मात्र विद्यार्थ्यांच्या स्वयं शिक्षणाला, सहभागाला, स्वयं अध्ययनाला महत्त्व आले आहे. पूर्वी अध्यापन साधने नाममात्र होती तर आता मात्र विद्यार्थ्यांच्या स्वयं शिक्षणाला, सहभागाला महत्त्व आले आहे. पूर्वी अध्यापन साधने नाममात्र होती तर आता अध्यापन साधनांचा सुकाळ आहे. पूर्वी शिक्षण हे विशिष्ट वर्गासाठी सिमित होते तर आता सर्वांसाठी, समतेसाठी शिक्षण असा पुकारा होत आहे.
                        खरेतर शिक्षक भाग्यवानच म्हटला पाहिजे कारण नेहमीच त्याच्या भोवतालचे वातावरण चैतन्यमय असते. अनेक बालिश, उत्सुक चेहरे त्याच्याकडे आशेने बघत असतात. त्यांना तृप्तीचा आनंद शिक्षकाने द्यावयाचा आहे. शिक्षणक्षेत्राचा किंवा शिक्षकी पेशाचा विचार करता प्रत्येक शिक्षकाला काही किमान गोष्टींची जाणीव असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट या क्षेत्रातील आपला संबंध सातत्याने विद्यार्थ्यांशी येतो. काही शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये मिसळणे, त्यांना समजावून घेणे सहजगत्या जमते. तर काहींना हे कौशल्य जाणीवपूर्वक जोपासावे लागते. त्यामुळे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला साजेश्या उपक्रमात भाग घेणे हे समाधानकारक असेलच.  


Teaching is not just profession but it is mission.

          जरी शिक्षिकी पेशा हा पोटापाण्याचा व्यवसाय असेल किंवा मुख्य आर्थिक स्त्रोत असेल तरीसुद्धा केवळ आर्थिक क्रांती हे एकमेव ध्येय नसावे. या ठिकाणी 'आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना |' अशी आदर्शवादी भूमिका अपेक्षित आहे. याचे कारण म्हणजे पालकांप्रमाणेच शिक्षकही मुलांसाठी आदर्श असतात. त्यामुळे 'मी सांगतो तसे वाग, मी वागतो तसे नको' अशी भूमिका नसावी. शिक्षक विद्यार्थ्यांना स्वत:बद्दलची वास्तव जाणीव करून देण्यास मदत करू सतत 
           प्रभावी अध्यापनाचा मुलभूत पाया म्हणजे आशय होय. अध्यापनाला जीव की प्राण आत्मा मानावे. जीव ओतून अध्यापन करणारा शिक्षकच खर्या अर्थाने विद्यार्थांच्या गुणवत्तेच्या दिशेने नेतो. कुतूहल निर्माण होईल अशा प्रकारची अद्ययावत अध्यापनपद्धती, तंत्रे, प्रतिमाने यांचा वापर केल्यास अध्यापन परीमानकारक होते. शिक्षकाचे व्यावसायिक समाधान हे त्याच्या अध्यापन कार्यातच दडले आहे. भाषेवरील प्रभुत्व, शिस्त व वक्तशीरपणा व विनोदबुद्धीने केले तर दुधात साखर कारण 'यथा राजा तथा प्रजा' या म्हणीनुसार 'जसा शिक्षक तसा विद्यार्थी' घडतो.
              वर्गात अध्यापन करत असताना प्रगत विद्यार्थ्यांसोबत अप्रगत विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागतात कारण सर्वच विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक सारखा नसतो. घरातील वातावरण, प्रेम, सुविधा सारख्याच नसतात. अशावेळी शक्कल लावून वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करावा लागतो. उदा. कथाकथन पद्धती, प्रश्नपद्धती, प्रकल्पपद्धती, चर्चात्मक पद्धती, नाटक पद्धती, इत्यादी. अशा विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करताना सतत विषयाची पुनरावृत्ती करावी लागते. पंचइंद्रियांचा पूर्ण वापर करून ज्ञानदान करावे लागते. उदा. सफरचंद नुसते पाहून मनावर त्याची छाप मर्यादित पडेल, परंतु तेच सफरचंद हाताळण्यास दिले, स्पर्श केला, वास घेतला, स्वाद चाखला तर त्याची गाढ छाप मनावर बसते.

               माझ्या मते, अध्यापन जर यशस्वी करायचे असेल तर सर्वात प्रथम नियोजन महत्त्वाचे असते. हर्बाटच्या पंचपदीनुसार आपल्याला दैनंदिन अध्यापनाच्या घटकाचा जीवनाशी संबंध जोडता आला पाहिजे. उदा. विज्ञानातील विविध प्रयोग हे दैनंदिन जीवनाशीच निगडीत आहे. पावसाळ्यात येणारे गढूळ पाणी शुद्ध असते का? ते कसे शुद्ध करता येईल? अशा प्रश्नांनी पाण्याचे शुद्धीकरण शिकवावयास सुरुवात केली तर अध्यापन निश्चितच परिणामकारक होईल. अध्यायनार्थीची पातळी लक्षात घेऊन, पुर्वज्ञानाचे दुवे लक्षात घेऊन त्यांना समजून घेणारा, शिक्षकच चांगले अध्यापन करू शकतो. उदा. गुणाकार शिकवताना बेरजेचे ज्ञान पडताळणे आवश्यक असते. भागाकार शिकवताना गुणाकार, वजाबाकीचे ज्ञान पडताळणे आवश्यक आहे.

                पाठ्यपुस्तकातील घटक कोणताही असो, पाठ्यपुस्तकाद्वारेभूतकाळातील घटना, त्यांची वर्तमानाशी तुलना करून भविष्याचा वेध घ्यायला शिक्षण देणे हेच आनंददायी शिक्षण प्रक्रियेचे मूळ उद्दिष्ट आहे. 
         माझ्या मते शिक्षक किती शिकवतो. यापेक्षा कसे शिकवतो? हे महत्त्वाचे आहे. ज्ञानदानाबरोबर जीवनकौशल्याची रुजवणूक, गाभाघटक, नैतिकमुल्ये यांचा विचार करणे गरजेचे असते. विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. नवीन शिक्षणप्रणालीनुसार शिक्षकाने काम करायचे असते, हे जरी खरे असले तरी शाळेतील शिक्षकाचे महत्त्व कमी नाही. विद्यार्थी कार्यप्रवृत्त झाला पाहिजे, त्याला अभ्यासाची गोडी निर्माण झाली पाहिजे, चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक मुल्यांची जोपासना करणे इत्यादी जबाबदाऱ्या अध्ययनाद्वारे - अध्यापानाद्वारे शिक्षकाला पार पडायच्या असतात.
           अध्यापनात कला व शास्त्र यांचा सुरेख संगम साधला तर सुलभ प्रक्रिया होते. कला व्यक्तीपरत्वे बदलते. त्यामुळे ती वेगवेगळ्या कौशल्यांचा वापर करून समृद्ध करता येते.


'मी ऐकले, मी विसरलो,
मी पाहिले माझ्या लक्षात राहिले,
मी केले मला समजले,
मी अनुभवले मला उमजले.'


          कृतीयुक्त सहभागातून संबोध पक्के होतात. पर्यावरण, विज्ञान, भूगोल या विषयांत भोवतालच्या परिसरातील डोंगर, नदया, आकाश, तारे, झाडे, फुले, पक्षी इ. निरीक्षण करून अनुभव घेतला तर तो कायमस्वरूपी होतो.
         इंग्रजीचे संवाद, one act play घेताना योग्य पात्रांची निवड करून नाट्यीकरण पद्धतीने पाठ घेतल्यास वेगळ्या पद्धतीने अर्थ समजून सांगण्याची गरज नाही. सतत ऐकत राहणे हि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. याउलट मुलांचा सहभाग घेतला तर मुलांना आनंद होतो.
आपल्या विषयाकडे आकर्षित करण्यासाठी योग्य वातावरणनिर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे.इंग्रजी विषयात शब्दांचे अर्थ समजून सांगताना 'Direct Method' चा वापर करताना विविध उदाहरणे, वाक्य, कृती, वस्तूंचा वापर केला गेला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. मग आपली भूमिका काय? आपल्याला एवढंच करता येईल. त्या माहितीचे ज्ञानात विशेषतः व्यवहार्य उपयोग करता येईल याकडे लक्ष दिली पाहिजे. अद्ययावत ज्ञान देण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करताना शिक्षकाने स्वत:ला अद्ययावत ठेवले पाहिजे.
            आज अध्यापक, अध्यापन, अध्ययन या सर्वच भूमिकांमध्ये होणाऱ्या बदलांना आनंदाने सामोरे जाणे गरजेचे आहे. आपल्या आनंदी अध्यापनाने ही कला विकसित करणे आपले आद्य कर्तव्य आहे. जाता - जाता एवढंच म्हणेन -

'मातीचे गोळे नव्हे,
सजीव चैतन्यांचे कलश हे...
या कलशांना सजवूया, घडवूया,
ज्ञानरूपी बनवूया....
साक्षर भारत घडवू या,
 साक्षर भारत घडवू या,|'

माझी ओळख

मी सौ शिल्पा योगेश पाटील विकास मंदिर सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय  उल्हासनगर ४ येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझा इमेल आयडी patilshilpa907@gmail.com my mobile no is 8691049880 
अध्यापन एक कला