Saturday, 6 May 2017

ही गोष्ट आहे, दोन मित्रांची.

ही गोष्ट आहे, दोन मित्रांची. एक सामान्य तर दुसरा असामान्य. दोन विपरित वृत्तींचे माणसं एखाद्या वेळी निभवुन घेतिल, पण जर त्यातला एक “दिव्यांगी” असेल तर..? सिनेमातली ‘दोस्ती’ वगैरे ठिक आहे हो..., आपण विचारात तेव्हां पडतो, जेव्हां अशे मित्र आणि त्याचं जीवन आपल्या डोळ्या समोरुन जातो. तर मित्रांनो, अशीच एक मैत्री, जी मी जवळुन अनुभवली आहे, त्यांची ही गोष्ट.
      कॉलेजमधे असताना, मी ज्या मेस मधे जेवायला जात होतो, तिथे अशेच् दोन मित्र जेवायला यायचे. एक ‘अजय’ नावाचा, सावळा उंचपुरा आणि अप-टु-डेट मुलगा, जो मेस मधे आल्या-आल्या आदि दोन खुर्च्या रिजर्व करायचा आणि बाहेर जाउन गाडीवर बसलेला आपल्या दिव्यांग मित्र ‘भावेश’ ला, ज्याचे दोन्ही पाय कंबरेपासुन लुळे होते, आपल्या दोन्ही हातात अलगत उचलुन आणायचा आणि एका खुर्चीवर बसुन द्यायचा आणि स्वतः बाजुच्या खुर्चीवर बसुन जेवायचा. आम्ही सगळे त्यांच्याकडे मोठ्या कौतुकीने बघायचो, ते कशे एकामेकाला मैनेज करतात आणि मुख्य म्हणजे ते दोघं अगदि सामान्य लोकांन प्रमाणे वागायचे. कशाची ही परवा न करता, ते सहज आप-आपले कामं करायचे, जणु त्यांना आता एकामेकाची सवयच् लागली असावी.
      अजय आणि भावेश रोज सकाळी आणि संध्याकाळी मला भेटायचे. हळु हळु परिचय वाढला आणि मी एके दिवशी त्यांच्या रुमवर दोघांना भेटायला गेलो, सहज बोलता बोलता मी त्याच्याबद्दल चौकशी केली, तर भावेश म्हणाला, “बाबु, याचे वडिल आमच्याकडे लहानपना पासुन लाकडाच्या टालावर लाकडं विकण्याचं काम करायचे. आमच्याकडे फॉरेस्टचे लाकडं येतात आणि लाकडं विकणं हा आमचा व्यवसाय आहे. याचा आणि माझा जन्म एकाच महिन्यात झालं आहे, मी जरी काही दिवस मोठा असलो, पण हा पट्ठा माझ्या मोठ्या भावासारखी देखरेख करतो. अगदी म्हणजे, सकाळी संडासापासुन तर रात्री झोपुन देयी पर्यंत, हा माझी सेवा करतो. लहानपना पासुन हा माझ्या सोबतीला आहे, तेंव्हा हा मला साईकिलवर शाळेत घेउन जायचा. आता पल्सरवर नेतो... हा-हा-हा...” दोघेही हासायला लगले.
“बरं का मन्या...” चहा देत अजय बोलला, “लहानपना पासुन माझं संपुर्ण खर्च शेटजी, भावेशचे वडील उचलत आहे.”
“अरे पण तु माझी सेवा करित नाहीका...?” भावेश हसत म्हणाला...! मग दोघही हसायला लागले. मी पण चहा घेत त्यांच्या आनंदात सामिल झालो.
      भावेश हा एका गुजराती कुलिन घराचा दिव्यांग पुत्र होता आणि त्यांचा लाकडाचा मोठा व्यवसाय होता. अजय, हा त्यांच्याकडे काम करणार्या एका गडी-माणसाचा गरिब मुलगा. जेमतेम पगारात् अजयचे वडिलांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केलं नसावा कि त्यांच्या सारख्या गरिब मजुराचा मुलगा, आपल्या मालकाच्या मुलासोबत सि.ए.चं शिक्षण घ्यायला शहरात् जाणार..! नशिबाचे खेळ बघा, अजयचा भविष्य, हा भावेश मुळेच् चमकणार होतं..! भावेश जर दिव्यांग नसता, तर अजय जास्तित जास्त आपल्या वडिलांच्या सोबत टालावर कारकुन झाला असता..., पण आता तो सि.ए. होणार होता. कुठे अकाऊंटंट आणि कुठे सि.ए., खुप मोठा फरक आहे यात, आणि याची परिणिती भविष्यात काय होणार होती, देवालाच् माहित.
      आमची भेटीगाठी रोजच् व्हायची. ते दोघं कधी सिनेमा तर कधी पानीपुरी च्या ठेल्यावर सुद्धा भेटायचे. पण असामान्याला सुद्धा सामान्याप्रमाणे कसं जगायचं, हे कुणी त्यांच्याकडुन शिकावं. वर्षा वर वर्ष भराभर निघत होते, आम्ही सुद्धा आप-आपल्या शिक्षणाच्या अंतिम पडावावर येउन पोहोचलो होतो. एके दिवशी मेस मधे अजयला एक फोन आला आणि त्याच्या चेहर्यावरचे रंग उडाल्यासारखे वाटले मला. तो फोन घ्यायला बाहेर आला आणि थोड्यावेळानी बोलुन जेवण आटोपटं घेतलं. भावेश त्याच्याकडे उत्सुकतेनी बघत होता कि आता हा मला कुणाचं फोन होतं, हे सांगेल...! शेवटी त्यांनिच् अजयला विचारले, “कुणाचा फोन होता रे..?”
“ऑफिस मधुन होता, सरांचा...” अजय म्हणाला.
      ऑफिस म्हणजे जिथे हे दोघं आर्टिकलशिप करित होते, हे मलापण कळलं, पण त्यात घाबरण्यासारखं काय होतं, हे भावेश सोबत आम्हा सगळ्यांना विचारात टाकत होतं, पण अजयच्या सेवाभावामुळे त्याच्या या कृतीत् जास्त काही शंका घेणं अम्हाला योग्य वाटत नव्हतं. नंतर मला कळलं, अजय ऑफिसच्या एका आर्टिकल मुलीच्या प्रेमात पडला होता...! प्रेम हा जर सांगुन आला असता तर भावेशनी त्याला कधीचं ‘नो-एंट्री’ चा बोर्ड दाखविला असता.., कारण अजय जर त्याच्या जिवनातुन एकदा का निसटला, तर त्याची देखरेख कोण करणार... हा एक मोट्ठा यक्षप्रश्न भावेशसमोर उभा होता. भावेशला कळल्यावर तो कसा रिएक्ट करणार, याची मला उत्कंठा आणि भिती पण होती.
      भावेशला, अजयचं प्रेम-प्रकरण कळायला जास्त दिवस लागले नाही, पण तो मोठ्या मनाने त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करित होता. दिव्यांगी माणसं फार प्रेमळ आणि चांगल्या मनाचे असतात, हे माझ्या एकुण अनुभवाने मी सांगु शकतो. काही वेगळे असतात, पण भावेशनी आपल्या मनावर पुर्ण ताबा कमविला होता आणि तो कुठल्याही प्रसंगाला तोंड सुद्धा द्याला तैयार होता. काळानी भावेश साठी काय लिहुन ठेवले होते, देव जाणे. पण त्याचं भलं व्हावं, हे आम्हा सगळ्यांना वाटत होतं..!
      दिव्यांगी मुलाला त्याच्या आई-वडिलांन् शिवाय दुसरं कुणीही समजु शकत नाही, पत्नी सुद्धा नाही, कारण तिचं त्या व्यक्तिशी रक्ताचं नातं नसतं. मग अजयतर परका होता, फक्त एका उपकाराखेरीज भावेशची सेवा करायला भाग पाडायला दुसरं काहिच् कारण नव्हतं त्याला. तसं बघितलं तर उपकार फेडण्याकरिता दुसरे अनेक मार्ग असु शकतात, तो या सेवेच्या मोबदल्यात पैशे घेउ शकत होता, पण तरी तो निश्काम भावनेने भावेशची सेवा करित होता. लहानपना पासुन तर आता २४-२५ वर्षा पर्यंत, खुप मोठा काळ असतो हा. जीवनहा नेहमी बदलत असतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या नंतर, प्रत्येक तरुण मनाला कुणाचीतरी साथ लागते, त्यांच्या सळसळणार्या उग्र रक्ताला हळुवार फुंकर घालणारा कुणीतरी हवं असतं. अजयचं मनसुद्धा कुणालातरी शोधित होता, कि जिच्या ऑफिसमधे येताच एक परिचित परफ्युमचा झोका सरळ डोक्यात् शिरणार, कि जिच्या मोकळे केसांचा स्पर्श हवंहवंसं वाटणार, कि जी चोर नजरेनी आपल्या मैत्रिणीच्या घोळक्यातुन त्याला स्माईल देणार, कि जी केसं सावरण्याच्या निमित्याने त्याला “हाय...” म्हनणार, कि जी ऑडिट करिता बाहेर जाता जाता, “कॉल मी..” चा संकेत देणार...!
      अजय सुद्धा एक माणुस आहे, त्याला सुद्धा मन, भावना आहे, त्याचं सुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, एक सेवाभावी मन आहे, मग त्याला थोडं स्वतःसाठी जगणं, इतकं स्वातंत्रतर मिळालाच पाहिजे, नाही का..? भावेशला सुद्धा हे कळत होतं, तो दिव्यांगी आहे, पण अजयतर नाही..! तो अक्षम असेल, पण अजयतर सक्षम आहे..! आणि मन मोठं केल्यानी त्याचे लुळे पायतर सरळ होणार नाही, कि त्यात प्राणतर येणार नाही..! आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत त्याला एका आधाराची गरज भासणार होती, हा एक कटुसत्य भावेशला माहित होतं, म्हणुन कधी कधी तो बेचैन होउन जायचा, कपाळावर घाम यायचा आणि तो आपल्या नशिबाला दोष द्यायला लागायचा..! मला इतकी बुद्धि दिली, दोन व्यवस्थित पाय दिले असते तर काय बिघडलं असतं देवाचं...? देवाच्या कारखान्यात् सुद्धा अंग प्रत्यंग, ‘आउट-ऑफ-ऑर्डर’ होतात का कधी..?
“काय विचार करतोस रे मित्रा..?” भावेश दचकला..! “अरे, मी आहे ना...!” अजय बोलला, जणु त्याला भावेशच्या मनाचं कळत होतं.
“तुला... अंजली आवडते का..?” भावेशनी अजयला सरळ प्रश्न विचारलं. अजय दचकला, त्याच्या कपाळावर घाम फुटायला लागलं..! “तुला कुणी सांगितलं..?” अजयनी डोळे खाली करत, अपराधभावने विचारले.
“फुल उमळला कि तो त्याच्या सुगन्धानेच् कळतं...!” भावेश मिस्किलपणे बोलला, “ऑफिस मधे सगळ्यांना माहित आहे तुमच्या प्रकरणाबद्दल...”
“सॉरी...” अजय हळुच बोलला... “यात सॉरी बिरी कुठुन आलं आता..?” भावेश हसत बोलला... “तु काय माझा गुलाम आहेस..?”
“नाही, मी तुला सोडुन जाईन, असं तुला नको वाटायला..!” अजय सावरत म्हणाला.
“देवाकडुन बोलावनं आलं, तरी नाही जाशिल..?” भावेश मसकरी करित म्हणाला. अजय त्याच्या जवळ येउन खाली बसला आणि म्हणाला, “हे सगळं कसं आणि कधी झालं, कळलंच नाही.., ती खुप छान मुलगी आहे रे...” अजय अंजलीची बाजु घेत कुठेतरी स्वतःला विसरला..!
“ए, हलो... ओ रोमियो... कुठे भटकले तुम्ही..?” भावेश अजयच्या डोळ्यापुढुन हाथ हालवित बोलला... “मी जर तुझ्या जागी असतो, तर मलापण एकदा प्रेमात पडायला आवडलं असतं..!” भावेश सुद्धा शुन्यात कुठेतरी हरवला.
      एकाला प्रेम करता येत नाही, किंबहुना करण्याची परवानगी नाही, कारण तो अक्षम होता आणि दुसरा, जरी तो सक्षम होता पण प्रेमातपडुन सुद्धा तो प्रेम करु शकत नव्हता...! किती विरोधाभास आहे, नाही..? कारण प्रेम, हा एकट्याने होणारा क़ृत्य नाही आहे, त्याला संपुर्णता मिळते दुसरीकडुन दिल्याजाणार्या दुजोर्याची. एकेरी प्रेम, हा प्रेम नसुन मृगतृष्ना शिवाय काही नसतं. पण अजय आणि अंजलीचं प्रेम, हा दोन्हीबाजुनी सारखं होता. अजय हा एक बुध्दीमान, हुतकरु आणि आकर्षक तरुण होता, अंजली सुद्धा देखणी, प्रेमळ आणि हुशार मुलगी होती, आणि दोघंही सी.ए. होणार होते.., मग का बरं त्याचं मिलन होणार नाही..? ऑफिसमधे सुगबुग होतीच त्या दोघांनविषयी.., सगळे त्याची जोडी बघुन ‘मेड-फ़ॉर-इच-अदर’ म्हणायचे..! अजयच्या स्वपनाचा क्लायमॅक्स नेहमी भावेश जवळ येउन संपायचा, तो नेहमी अंजली आणि भावेशच्या मधे पिसुनजायचा. काय करावं काही कळत नव्हतं त्याला, अंजली सोबत लग्न केलं तर भावेश एकटा पडेल, अशी त्याची नेहमी कोंडी व्हायची. विचार करता करता त्याचे तारांबळ उडायचे..!
      तिकडे अंजली, अजय सोबत स्वतःच्या लग्नाचे स्वप्न रंगवित होती. तिला भावेश बद्दल किती संवेदना होत्या, देव जाणे. कदाचित नसेल, कदाचित गरज भासत नसेल. तिला माहित होतं, ते फ्क्त इतकच् कि अजयसोबत लग्नकरुन आपला नवीन ऑफिस सुरु करायचं आहे बस्स... तिच्या जीवनाच्या प्रायोरिटीज् मधे प्रथम क्रमांकावर हाच एकमेव उध्दिस्ट होता, बाकीचं नंतर बघुया... आदि आपल्या सख्याला जवळतर करु दे, नव्या जिवनाची सुरुवाततर होवु दे... तो दुसरी कुणीच्या होण्याआदि माझा होवु दे...! बस्स एकदा ‘एक’ होवु दे... माझा कान्हा मलाच भेटु दे... असं प्रत्येक गोपीला वाटत होतं... कारण तो होताच मोठ्या गुणाचा... सावळा, भोळा, एकनिष्ठ, हुशार आणि देखणा..!!! आणि यात वाईट काय, सांगाबरं..? स्वप्न रंगविने आणि त्याला पुर्णत्वाला आणने, हाचतर जीवन आहे. साम, दाम, दंड, भेद... माणुस आपले स्वप्न रंगवायला, या पैकी कुठलाही शस्त्र वापरु शकतो. त्याला शास्त्रानी सुद्धा पुर्ण परवाणगी दिली आहे, मग अंजलीने आपले स्वप्न का बरं पुर्ण नाही करावे..? अजय जर भावेशसोबत आर्थिक, भावनिक नात्यानी जुडलेला असेल, पण कधी न कधी त्याला स्वतंत्र व्हावच लागेल.., नाही का..?
       जवळ जवळ वर्षभरानी निकाल लागला, ते तिघंही सी.ए.ची परिक्षा उत्तिर्ण झाले. अजय अंजलीचं तर आनंद गगनात मावत नव्हतं. भावेश मात्रं काहीसं विचलित झाला होता. मी त्याला विचारलं, “आता पुढे काय करायचं विचार आहे तुझा..?” तो हसत म्हणाला, “बघुया... काय आहे पुढे, आपल्या नशिबात..” मला त्याच्या चेहर्यामागे अविरत दुःख दिसत होतं..! मी मनातल्या मनात त्याच्यासाठी प्रार्थनेशिवाय काहीच् करु शकत नव्होतो..! असं म्हणतात कि माणसानी, माणसाचे दुःख कमी करायला पाहीजे, त्याच्या कामात यायला पाहिजे. पण मी त्याच्या कुठल्याही कामात येऊ शकत नव्होतो. त्याच्या जीवनात् एकच् व्यक्ति कामात येऊ शकत होता, आणि तो म्हणजे, अजय..! पण अजयतर अंजलीचा होणार होता.
      सहा महिन्यानी अजय आणि अंजलीचं लग्न जुडुन आलं. नविन ऑफिसचं सेटअप आणि लग्न, अश्या दोन्ही कार्य एकाचवेळी, त्या सुद्धा तेवढेच इम्पॉर्टन्ट..! दोघांची तारांबळ उडालेली होती, लग्नाच्या पत्रिकेपासुन तर ऑफिसच्या कामापर्यंत, अहोरात्र कामच् काम. अजयनी भावेशला, काही दिवसासाठी गावाला जाण्याचे अनुरोध केले, आणि तो त्याला गावाला सोडुन आला. त्याला नविन घराची सोय सुद्धा करायची होती, अंजली घरात लागणार्या आवश्यक वस्तुंची खरिदारी करित होती. अजय, ऑफिस आणि लग्नाची तैयारित लागला होता. तो पत्रिका घेउन गावाला गेला आणि भावेश आणि शेटजींना लग्नाला आमंत्रित करुन, आपल्या आई-वडिलांना सोबत घेऊन परत आला.
      लग्नाचा दिवस उजळला, गुलाबाच्या सुगंधात् शहनाईचा सुर जणु सुगंध आणि सुरांचा मिलन वाटत होता. भावेश आपल्या आई वडिलांसोबत व्हिलचेअरवर आला होता. लग्न समारंभ आटोपल्यावर, अजय आणि अंजलीने, सगळ्यांना आपल्या नवीन ऑफिसला भेंट द्यायला विनंती केली. भावेशला मात्रं अपमानित झाल्या सारखं वाटत होतं. पण नाईलाजाने जावे लागले. सगळेजण अजय आणि अंजलीचे नवीन ऑफिस बघायला गेले. त्यांचे आई-वडिल आणि काही मित्र परिवार ऑफिसला पोहचले. छोटसं, नवीन चकचकित ऑफिस जणु त्यांचीच् वाट बघत होता. चेंबर मधे तिन खुर्च्या बघुन सगळे दचकले. “हा तिसरा कोण रे..?” भावेशनी आश्चर्याने विचारले. अजय आणि अंजलीने त्याची व्हिलचेअर मधल्या खुर्चीजवळ नेऊन त्याला अलगत उचलत, त्यावर बसविले आणि अंजली म्हणाली, “अजुन कुणाची असेल दादा..., फक्त तुमचीच्..!!” दोघं आशिर्वाद घेण्यासाठी त्याच्या समोर वाकले...! पण भावेश त्यांच्या समोर खाली, खुप खाली वाकलेला वाटत होता. त्यानी अश्रुपुर्ण नेत्रांनी आपले हाथ, अजय आणि अंजलीच्या डोक्यावर ठेवले...!!!
ही गोष्ट मी लिहीली नाही 
आवडली म्हणून share  केली⁠⁠⁠⁠

# "बेटी बचाव " म्हणताय ?

#  "बेटी बचाव " म्हणताय ? 
      का????
    उत्तर हवे- #    
                
 (लतिका चौधरी)

सर्वोच्च न्यायालयात एका एकतर्फी प्रेमातून त्रस्त एका आत्महत्या केलेल्या स्त्री संदर्भात न्याय देताना उद्विग्न न्यायाधीशाने काढलेले उद्गार--"या देशात महिला शांततेत का जगू शकत नाहीत?....."
 त्याचे वास्तव-(दै. सकाळ)
 महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत.विशेष म्हणजे महिलांचा मानसिक,शारीरिक छळ करणारे स्वतः आईच्या पोटी जन्म घेऊन आलेले,बहीण,मुलगी,बायको अशी 'बाई'च्या मायेखाली वाढलेले,जगत असलेले असूनही त्यांच्यात परस्त्रीला छळण्याची,तिला येनकेन प्रकारे हतबल,लाचार करण्याची,अपयशी ठरविण्याची,दुय्यम ठरविण्याची,'तू बाई आहेस..'हे बाईपण पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची,तिचा विनयभंग करण्याची निच प्रवृत्ती,हरामीपण, हैवानी, पाशवी वृत्ती झिरपते तरी कुठून?जर तर मर्द आहेत तर स्वताच्या पुरुषीपणावर, मर्दांगीवर त्यांचाच विश्वास नाही का?खरे मर्द,खरे पुरुष
'बाईपणाला लाचार करत नाहीत,'बाई ' ला कमी लेखत नाहीत,हक्क,जबरदस्ती,जुलूम करत नाहीत.
भारतात अनेक महान आत्मे होऊन गेलेत,
शिवाजी महाराज,शाहू,आंबेडकर,फुले यांच्या सारखे 'स्त्री'ला माणूस मानणारे जगोद्धारक ह्या खलनायकांच्या नजरेसमोर येत नसतील का?
पर स्त्री जर अशा हरामी वृत्तीच्या लोकांजवळ शांतपणे,सुरक्षितपणे,सन्मानाने राहू शकत नसेल तर यांची आई,बहीण,बायको,स्त्री जातीतील कोणतीही नाती यांच्या सानिध्यात कधीच कधीच सुरक्षित नसेल.
शाहू,फुले,आंबेडकर यांचा आत्मा,त्यांचे कार्य यांच्या हिणकस जन्माने,जगण्या-वागण्याने रडत,कुढत आहेत ह्याची ह्या 'माणूस'जातीला कलंक असणाऱ्या ,कफल्लक वृत्तीच्या लज्जेने
 मरत असेल.
राज्यघटनेने स्त्री ला शिक्षणाचे,जगण्याचे,अभिव्यक्ती            स्वातंत्र्य दिले,निर्णयाचे अधिकार दिलेत.
अंधाऱयात्रा संपेल,लख्ख उजाडेल,पिढ्या न पिढ्या अन्याय सहन करणाऱ्या बाईला मोकळा श्वास घेता येईल असे स्वप्न महान जीवांनी पाहिले.यश ही आले.पण  ' येरे माझ्या मागल्या...'सुरूच आहे.पाहिले पाढे पंचावन्न सुरूच आहे.
सीता,द्रौपदीपासून फरपट आजही सुरू आहे.
नावं, घटना,कारणे,निमित्त फक्त बदल.
भले कायद्याचे सरंक्षण (कागदावरचे)असो,
उच्च पदवी असो,अंतराळात भरारी मार,सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बन,राष्ट्रपती,पंतप्रधान बन, तुझी फरफट ,सोसणे काही संपणार नाही.गौरव किती?(दिखाव्याचा) -मातृदेवता,न्यायदेवता,
ग्रामदेवता,कुलदेवता....
भाषणं... स्त्री जातीचा पुळका असलेला पोकळ देखावा,...ढोंगीपणाला तोड नाही.
देवतेच्या रुपात पुजणारा हा देश तीला फक्त
आणि फक्त 'बाई'म्हणून पुजतो.
चुल आणि मुल ची मर्यादा सोडून तिने तिच्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्र पादाक्रानत केलीत,पण तिथं ती एकटीच.
(अरे हां, 'एकटी स्त्री' तर 'विकृत सांडांना खुर उधळायला मोकळे रानच ! 'एकटी स्त्री' म्हणजे त्यांच्या बापजाद्याचा मुलूखच ! त्या राक्षसांना कल्पना नसावी का, की कधीतरी आपली रक्ताची-पोटची पोर,आपलीच बायको ,आई 'एकटी' होऊ शकते?....नसावी कदाचित .  'स्त्री' घरची किंवा बाहेरची...तिच्या 'बाईपणाची 'मजा घेणाऱ्या 'भंडव्यांना'याची जाणीव असेलच कोठून ?)
 येनकेनप्रकारे 'हाती'आली नाही तर तिची बदनामी,टिंगलटवाळी,डावलणे,अनुल्लेख,  वगळून काढणे,त्याची झाली नाही म्हणून दुसऱ्याशी नावे जोडणे,अपप्रचार करणे असे 'राक्षसी, हैवानी'धंद्याचे उपद्व्याप ते करत राहतात.                                                             हे सर्व तिला कळते ही,पण ती आपल्या मर्यादा,संस्कृती,संस्कार जपते.वयक्तिक,  प्रापंचिक,सामाजिक,आर्थिक असे अनेक अडचणी मुळे ती हतबल,लाचार होते.तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहते. 
स्वतः शिक्षा भोगते कारण कायदा तिला माहीत 
असतो.चोर,गुंड,मवाली वृत्तीच्या या लोकांनी
पोलीसांना 'कंठपुतळी'करून ठेवलेले असते.
नेते,पुढारी यांनाही अशा गावगुंडांची गरज असते म्हणून तेही 'यांना'पाठीशी घालतात.
 मग सामान्य,लाचार,हतबल ,'बाई'ला 'बाई '
बनवून चूप केले जाते.ती जळत राहते,तगमग
करत राहते,कुणालातरी जगवण्यासाठी जगत 
राहते .'बाई'पणाचं ओझं वाहत राहते.
टुक्कार मात्र हसत,खिदळत,विजयोत्सव मनवत राहतात ......
पण 'त्यांना'कल्पना नाही-
नियती नावाची गोष्ट विश्वात अजूनही वास करते.अपमान हा गुणाकाराने परत मिळतो.कधी ना कधी नियतीची लाठी,मार पडतच असतो.नालायकाचा एक दिवस कुठल्या ना कुठल्या रुपात नायनाट होतच असतो. कर्माचे फळ भोगायला मिळते म्हणजे मिळतेच.
म्हणून 'बेटी बचाव','लेक वाचवा-लेक शिकवा'
असे म्हणण्यापूर्वी आधी तिच्या जन्माचा सन्मान करा.तिला 'माणूस'म्हणून वागणूक द्या.⁠⁠⁠⁠

खूप काही शिकण्यासारखे

खूप काही शिकण्यासारखे ,विस्मरण झालेले...

१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे.  धेनु मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.

२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची  घेवडा  भाजी  गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते. 

३. अन्नाचे एक शीत तरी सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते. 

४.  वाळवण घालताना आज्जी सूर्य मंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची. 

५. रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची, स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये. 

६.  मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा,माझ्या लेकरांना डसू नका. 

७. तुळशीला दिवा लावायची, चिलटे,किडे नष्ट होऊन घरात येत नाही.ती माझ्या घशाला अाराम देते मी  तुळशीच्या पानांना उब देते.

८. लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे. 
भाकरी पण चंद्रासारखी वाटते , 
सावल्यांची भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, भुमातेला पण शांतता मिळते म्हणायची. 

९. दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची. 

१०. झोपताना तांब्याच्या धातुतील तांब्या पाणी भरून डोक्याशी ठेवायची, चांगले असतेच पण तापलेल्या 'भु'चा तप्त असा भार किंवा स्पंदने  तांबे घेते आणि आपल्याला शांती देते. 

अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही..⁠⁠⁠⁠

गोष्ट मोलाची

एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे.

तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे.

तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते....

हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ  वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.....

आता तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "सर, किती किंमत आहे या बाहुलीची?"

दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने  विचारतो " बोल तू काय देशील ?"

मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?"
दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत.  ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो.
मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. 

हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता व त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?"

दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, 
"आपल्यासाठी हि केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हि शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.
हि गोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल."😊☺⁠⁠⁠⁠

नांदत्या घराची किंमत ....

नांदत्या घराची किंमत ....

....दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून  मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात. 

त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.

7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?" 

अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात . 

ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती .मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून . 

शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".

एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.

निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही . 

त्या म्हणाल्या "नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले,अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला...खूप छान वाटलं ग "

या एका वाक्यात मीच रडवेली झाले . " पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या " परमेश्वराची इच्छा "

खरा सांगू ..सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे .....आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .

-- अनामिक⁠⁠⁠⁠

Sunday, 23 April 2017

पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक

पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक --------------------


एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. 

अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ....

     * * या वर्षात माझ्या शरीरातलं  पित्ताशय काढुन टाकलं 

आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं . 

     ** याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पुर्ण केली 

आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली 

** याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं  दु:ख मला पचवावं लागलं  


** याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला.... 

त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे ! 
जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले
 शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..!

                  आणि शेवटी त्यांनी  लिहिले ..…. 

"खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!!

    इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. 

भरलेले डोळे आणि विचारात गढुन गेलेल्या आपल्या पतिकडे पहाताच त्याना काहितरी वेगळ असल्याचा अंदाज आला.
 सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला
 आणि काही न बोलता त्या खोलीतुन निघुन गेल्या. 

                  थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता. 

तो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला. 
लेखक महाशयानी तो कागद उचलुन वाचायला सुरुवात केली. 
त्यात लिहिले होते ..

         ** गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढुन टाकले. 

आता मला कुठलाही त्रास नाही. 
मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!

       ** याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली.

 आणि एक चांगल्या नोकरीतुन सन्मानाने सेवानिवृत्त झालो, 
आता अजुन चांगलं आणि लक्षपुर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!

      ** याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबुन न रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले ..!!


     ** याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, 

जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला 
आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!

  आभारी आहे देवा ...!!

 किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तु मला ..!!"

         बघा मित्रानो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!! 

नकारात्मक विचार बाजुला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !! 

  आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.

 आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो. 
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
 आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..!!!

     त्या घटनेची वाईट बाजु न पहाता चांगली बाजु, सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला शिका. 

जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा ...!! 
जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!

   Every Dark cloud has a silver lining …!!!

 प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!! 

     शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे. 


आपल्याकड काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!


 दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!


  शेवटी पाडगावकरांच्या  ओळी आठवतात….!!


पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!

सरला आहे म्हणायचं

कि भरला आहे म्हणायचं?

सांगा कसं जगायचं?

कण्हत कण्हत 
कि गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा....!!



मित्रानो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा ..!!

घर निंदकाचं

कडू डोस 15

घर निंदकाचं

म्हण आहे,'निंदकाचे घर असावे शेजारी'
अगदी बरोबर आहे.निंदक म्हणजे निंदा करणारा.सोप्या भाषेत टीका करणारा.
निंदकाला काय काम असते? चांगले चालले असेल तरी काहीतरी निंदा करून लोकांच्या मनात भूत घालून द्यायचे. लोकांचेही काही खरे नसते,ग्लोबल नीती प्रमाणे एक गोष्ट सारखी सारखी सांगितली की ती लोकांना खरी वाटायला लागते.दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा जवळचा अधिकारी ग्लोबल याने ही ट्रिक वापरली. आपण सतत आघाडीवर आहोत असे ग्लोबल आकाशवाणी वरून लोकांना सांगत होता.लोक खोट्या विजयाला भुलून  हिटलरचा उदो उदो करत होते.हिटलर इतका काळ युद्धात टिकून राहिला त्याचे श्रेय ग्लोबललाच दिले जाते.

निंदक  तेच तर करत असतो.एकच गोष्ट फिरवून फिरवून लोकांना सांगत असतो आणि लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतो.
गोष्ट असते लहानशी. पण  तो आपल्या पद्धतीने तिला मालमसाला लावून सांगत असतो.त्यामुळे लोकांचे मनोरंजन होते आणि समोरच्या व्यक्ती बद्दल मत वाईट होते. खरे म्हणजे एखादी व्यक्ती जर एखाद्या व्यक्ती बद्दल काही माहिती सांगत असेल तर लगेच तिच्यावर विश्वास ठेवण्या अगोदर त्याची खातरजमा करायला काय हरकत आहे?पण लोकही फार उतावीळ असतात.घटनेची खातरजमा ना करता ती गोष्ट पसरवायला सुरुवात करतात.आणि निंदकाचे फावते.
ज्याची निंदा केली जाते त्यांच्यापर्यंत बातमी खूप उशीरा पोचते.किंवा जरी पोचली असेल तरी तो सौजन्य दाखवून त्यास काहीच माहित नाही असे दाखवतो आणि  भांडणाचा प्रसंग टाळतो.
एक इंग्रजी सुभाषित आहे,'देवाने नेत्याला संपवण्यासाठी अनुयायी निर्माण केले.
अनुयायी नेत्यांची तळी उचलत असतो.नेत्याने काहीही केले तरी 'खूप छान साहेब.' असेच म्हणत असतो तो. त्यामुळे नेता आणखी फुगतो आणि त्याच्या कडून परत परत त्याच चुका होत जातात.आणि त्याची अधोगती होत जाते.
पण तोच कार्यकर्ता असेल तर त्याच्या नेत्याने काही चुकीचे केले असेल तर लगेच सांगतो,'साहेब तुम्ही इथे असे बोलायला नको होते.ते तुमच्या फायद्याचे नाही.तुम्हाला त्रास होऊ शकतो.लोक तुटू शकतात. विरोधकांना फायदा होऊ शकतो.
पण दुर्दैवाने खरे कार्यकर्ते कमी असतात.आणि बोगस अनुयायी जास्त  असतात.ते नेत्याला बुडवत असतात. आज महाराष्ट्रात असे अनेक प्रकार नेत्यांबाबत बघायला मिळतील. नेते त्याच त्याच चुका करताना दिसतील.

'निंदकाचे घर असावे शेजारी'असे म्हटले जाते त्याचे कारण असे की,निंदक तुमच्या प्रतेक गोष्टीवर लक्ष ठेऊन असतो.तुम्ही काय करता?कुणाशी बोलता?काय खाता?तुमचे काय कार्यक्रम ठरलेले आहेत?हे जितके तुमच्या जवळच्या किंवा घरातल्या लोकांना माहित नसते तितके निंदकाला माहित असते.कारण त्याला काही काम धंदा नसतो.त्याचा एकच उद्योग असतो.तुम्हाला अडचणीत पकडायचे आणि त्याचा डांगोरा पिटायचा.तुमच्या बद्दल वाईट सांगून जनमत खराब करायचे.आणि वातावरण बिघडवायचे.एक पाहिले का?निंदकाला तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी कधीच दिसत नाहीत. एकदा एका शिक्षकाने एक मोठा पांढरा कपडा विध्यार्थ्यांपुढे ठेवला त्यावर एक छोटासा काळा डाग होता. विदयार्थ्यांना  त्याचे वर्णन करायला सांगितले.प्रत्येकाने कापडा किती मोठा आहे.किती शुभ्र आहे.कुठे खराब झाला आहे.तो कसा असायला हवा होता हे सगळे सांगितले आणि सगळ्यांनी एक काळ्या डागाचे त्यांच्या भाषेत वर्णन केले.काळ्या डागाचे सर्वानीच वर्णन केले.
शिक्षकाने सांगितले,'सर्वानी काळ्या डागाचे वर्णन केले.पण सगळ्याना इतका मोठा पांढरा कपडा दिसला नाही.त्यातील एक छोटा डाग लगेच दिसला.आणि विशेष म्हणजे सगळ्यांचे लक्ष फिरून फिरून त्या काळ्या डागाकडेच जात होते.तसेच असते.निंदकाचे केलेली निंदाच आपल्याला दिसत असते.ज्याची निंदा केली त्याचे काम दिसत नाही. त्याने इथपर्यंत येण्यासाठी खाल्लेल्या खस्ता दिसत नाहीत. त्याचा इतका मोठा त्याग दिसत नाही.त्यांना दिसते फक्त निंदकाने केलेली निंदा.
सच्ची माणसे कधीच निंदेला घाबरत नाहीत उलट निंदकाला जवळ घेऊन शाबासकी देतात कारण त्याच्या मुळेच त्याच्या कडून घडणाऱ्या खूप चुका वाचलेल्या असतात. निंदकाने अगोदरच त्याला सावध करून टाकलेले असते.
तसे पाहिले तर ,दुसऱ्याच्या अंगावर शेण फेकून त्याचा आनंद घेणाऱ्या निंदकाचेही हात भरतातच ना?
निंदक चांगल्या गोष्टी पण वाईट ठरवण्यात खूप माहीर असतात.कारण त्यांचा धंदाच तो असतो.त्यामुळे हुशार माणसे त्याकडे लक्ष देत नाहीत. आणि आपली गाडी रुळावरुन घसरू देत नाहीत.

निंदक पराचा कावळा करण्यात पटाईत असतात.ते पराचा कावळा करतात पण लोक खरोखरचा कावळा समजतात.
आम्ही बारावीला असताना इंग्लिश मध्ये एक कविता होती तिचा सार असा, एक टीकाकार म्हणजे निंदक ,सलून मध्ये जातो.सलून मध्ये काही लोक बसलेले असतात.त्यालाही दाढी करायची असते तो तिथे बसतो आणि अचानक त्याचे लक्ष समोर असलेल्या घुबडावर जाते.घुबड न्हाव्याच्या डोक्यावर एका फळीवर असते.टीकाकार आपली हुशारी दाखवण्यासाठी मोठयाने बोलायला लागतो,' हे जे घुबड आहे ना? ज्याने कोणी त्याची मूर्ती बनवली आहे ती खुप सुंदर आहे. पण त्यात काही चुका आहेत.सगळे लोक त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतात. त्याला आणखी हुरूप येतो.तो म्हणतो,घुबडाची चोच खूपच अनुकूचीदार झाली आहे, ती इतकी अनुकूचीदार नसते.'तो आपली हुशारी दाखवण्यासाठी आणखी सांगतो,'खरे म्हणजे घुबडाचे पंख इतके मोठे नसतात.ते थोडे आखूड झाले असतात.तसे घुबड झाले आहे छान. त्या कलाकाराला दाद दिली पाहिजे.पण घुबड इतके जाड नसते.त्याची जाडी थोडी कमी पाहिजे होते.त्याचे पाय खूपच लहान झाले आहेत थोडे।मोठे पाहिजे होते.आणि नखे खूपच बोथट झाली आहेत ती टोकदार पाहिजे होती.बाकी घुबड झाले आहे छान.पण त्याची मान खूपच लांब झाली आहेघुबडाची मान इतकी लांब नसते.पण झाले आहे छान.आणि डोळे किती मोठे काढले आहेत ,त्याची बुबुळे इतकी मोठी थोडीच असतात."असे म्हणत असतानाच घुबडाने थोडीशी मान हलवली.बुबुळे कोठी केली.आणि तोंडातून एक आवाज काढला.
टिकाकाराचे तोंड बघण्यासारखे झाले.आणि सलून मधील सगळे हसू लागले.
अशा पद्धतीची फजिती निंदकाची होते.एखाद्याला एखादी गोष्ट सांगायला जातो आणि ज्याला सांगायला जातो तोच प्रत्यक्ष साक्षीदार असतो.त्यामुळे निंदकाचे तोंड बघण्यासारखे होते.
निंदक शेजारी असल्याने आपला दिवस खूप चांगला जातो.आपल्या चुका आपण टाळण्याचा प्रयत्न करतो.कारण निंदकाच्या हाती आपली एखादी गोष्ट लागू नाही म्हणून आपण काळजी घेत असतो..

 कडू डोस:


निंदकाला लगेच प्रती उत्तर देऊन नका.त्याने केलेली निंदा सहन करायला शिका.आणि जमलेच तर आपल्यातले त्याने दाखवून दिलेले अवगुण काढायला शिका.तो सतत आपल्यावर टीका करतो म्हणून त्याचे आभार माना. आणि त्याला आणखी टीका करण्याची संधी द्या.""म्हणजे एक काळ असा येईल की तुमच्यातील सर्व अवगुण नष्ट होऊन त्याला निंदा करण्यासाठी काहीच राहणार नाही. आणि तो जुनेच चघळत बसेल.मग हसण्याची पाळी तुमची असेल.


शांताराम निकम
22 एप्रिल 2017⁠⁠⁠⁠